लोकसभेला राज्यात आघाडी युतीवर भारी; देशात मात्र एनडीएचीच बाजी, सर्व्हेमधील अंदाज

लोकसभेच्या दृष्टीने महाराष्ट्र हे उत्तर प्रदेशनंतर मोठे आणि महत्त्वाचे राज्य आहे.
लोकसभेला राज्यात आघाडी युतीवर भारी; देशात मात्र एनडीएचीच बाजी, सर्व्हेमधील अंदाज
Published on

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत देशाचा कल काय असेल, याबाबत इंडिया टुडे आणि सी व्होटरने केलेल्या सर्व्हेमध्ये महाराष्ट्रात काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची महाविकास आघाडी भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीवर भारी पडेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. देशात मात्र भाजपप्रणीत एनडीएच बाजी मारेल, असा या सर्व्हेचा अंदाज आहे.

लोकसभेच्या दृष्टीने महाराष्ट्र हे उत्तर प्रदेशनंतर मोठे आणि महत्त्वाचे राज्य आहे. त्यामुळे सत्तेची समीकरणे जुळवताना महाराष्ट्रात सर्वाधिक जागा मिळवण्याचे सर्वच पक्षांचे लक्ष्य असते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील ४८ पैकी ४१ जागा भाजप युतीने जिंकल्या होत्या. ज्यात भाजपला २२, तर शिवसेनेला १९ जागा मिळाल्या होत्या. तेव्हा शिवसेनेत फूट पडली नव्हती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढवूनही राष्ट्रवादीला ४, तर काँग्रेसला १ जागा मिळाली होती, तर एमआयएमला एका जागेवर विजय मिळवता आला होता.

मात्र, गेल्या काही वर्षांत राज्याच्या राजकारणात झालेल्या चिखलामुळे सध्याचे चित्र वेगळे असल्याचे इंडिया टुडे-सी व्होटरच्या सर्वेक्षणात म्हटले आहे. आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास राज्यात महाविकास आघाडी भाजप, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्यावर भारी पडणार असल्याचे चित्र समोर आले आहे. राज्यात महाविकास आघाडीला ४८ पैकी २६ जागा मिळतील, ज्यात काँग्रेसला १२, शिवसेना उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांना १४ जागा मिळण्याची शक्यता आहे, तर भाजप आघाडीला २२ जागा मिळतील, असा अंदाज आहे. महायुतीला महाराष्ट्रात ४०.५ टक्के, तर महाविकास आघाडीला ४४.५ टक्के मते मिळतील, असा अंदाज आहे.

आम्ही ३५ जागा जिंकू -राऊत

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी या सर्व्हेवर प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडीला ४८ पैकी ३५ जागा मिळतील, असा दावा त्यांनी केला. आम्ही प्रकाश आंबेडकरांच्या सोबत निवडणूक लढवणार आहोत. आम्हाला ३० ते ३५ जागा मिळतील, असे राऊत म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in