कथा दोन रॅलींची! भारताबरोबर युरोपमधील शेतकरीही आक्रमक

आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी दिल्लीत ट्रॅक्टर मोर्चा काढण्याचे प्रस्तावित केल्याने दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवर सोमवारी वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती
कथा दोन रॅलींची! भारताबरोबर युरोपमधील शेतकरीही आक्रमक

नवी दिल्ली/माद्रिद: जागतिक हवामान बदलामुळे वाढलेला निसर्गाचा लहरीपणा, सरकारची चुकत गेलेली धोरणे, रासायनिक कीटकनाशक आणि खतांचा अतिवापर, बाजारातील चढउतार अशा अनेक कारणांनी जगभरात शेती हा व्यवसाय म्हणून बेभरवशाचा झाला आहे. त्यामुळे विविध देशांतील शेतकरी आपापल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले आहेत. गेल्या काही दिवसांपासून नवी दिल्लीच्या वेशीवर पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी शेतीमालाला हमीभावासाठी आंदोलन चालवले आहे. सोमवारी त्यांनी पतियाळा जिल्ह्यात मोठ्या कार्पोरेट कंपन्यांविरुद्ध फलक झळकावत घोषणा दिल्या. तर युरोपमध्येही शेतकऱ्यांनी असेच आंदोलन पुकारले आहे. परदेशांतून कमी दरांत धान्य आयात केल्याने युरोपीय महासंघातील (ईयू) देशांत अन्नधान्याच्या किंमती घसरल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले आहे. त्यावर तोडगा काढण्याच्या मागणीसाठी युरोपच्या शेतकऱ्यांनी सोमवारी स्पेनची राजधानी माद्रिद येथे युरोपीयन पार्लमेंटवर मोर्चा काढला. जर्मनी-पोलंड सीमेवर तैनात पोलिसांवर काचेच्या बाटल्या फेकल्या. या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी युरोपीय महासंघातील देशांचे कृषीमंत्री ब्रसेल्स येथे जमले आहेत. त्यांनी सरकारी लाल फितीला आणि खर्चाला कात्री लावून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी दिल्लीत ट्रॅक्टर मोर्चा काढण्याचे प्रस्तावित केल्याने दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवर सोमवारी वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांनी यमुना द्रुतगती मार्ग, लुहारली टोल नाका आणि महामाया उड्डाण पुलावर सोमवारी ट्रॅक्टर मोर्चा काढण्याचे ठरविले. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी सीमेवर कडेकोट बंदोबस्त ठेवून नाकाबंदी केली होती. कडक तपासणी करण्यात येत असल्याने दिल्लीतील चिला सीमा येथून नोइडाकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. दिल्ली-नोइडा सींमेवरही वाहतुकीचा बोजवारा उडाला होता. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे दिल्ली आणि हरयाणामधील सिंघू आणि टिकरी सीमेवरही वाहतूक बाधित झाली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in