
मुंबई : शत्रूच्या रडार यंत्रणेला चकवा देणारे, एकाचवेळी अनेक लढाऊ हेलिकॉप्टर उतरू शकणारे आणि शस्त्रसज्ज असे ‘निलगिरी’ लढाऊ जहाज, शत्रूला नेस्तनाबूत करण्याची क्षमता असलेली ‘प्रोजेक्ट १५ बी सुरत’ विनाशिका आणि पृष्ठभागविरोधी युद्ध, पाणबुडीविरोधी युद्ध, गुप्त माहिती गोळा करण्यात अत्यंत अद्ययावत असलेली पाणबुडी ‘वाघशीर’ आता भारतीय नौदलाच्या ताफ्यात येत्या १५ जानेवारीला दाखल होणार आहे. या तीन लढाऊ जहाजांचा नौदलात समावेश करण्याच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहण्याची शक्यता असल्याची माहिती नौदलातील सूत्रांनी दिली.
या ऐतिहासिक घटनेमुळे भारतीय नौदलाची सामुद्रिक ताकद वाढणार असून, स्वदेशी जहाजबांधणीमध्ये देशाने केलेली प्रगती अधोरेखित होणार आहे. ही तीनही लढाऊ जहाजे संपूर्णपणे माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. येथे डिझाइन करून बांधली गेली आहेत. संरक्षण उत्पादनाच्या संवेदनशील क्षेत्रात भारताच्या वाढत्या आत्मनिर्भरतेचा हा पुरावा आहे. या प्रगत युद्धनौका आणि पाणबुड्या यशस्वीपणे कार्यान्वित केल्याने युद्धनौका डिझाइन आणि बांधणीत झालेल्या प्रगतीमुळे संरक्षण उत्पादन क्षेत्रात जागतिक पातळीवर भारताचे स्थान मजबूत होईल, असे नौदलातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
‘निलगिरी’ लढाऊ जहाज
‘निलगिरी’ प्रोजेक्ट १७ ए चे प्रमुख जहाज असून, ‘शिवालिक’-क्लास फ्रिगेट्सच्या तुलनेत एक मोठी प्रगती आहे. फ्रिगेटच्या डिझाइनमध्ये लक्षणीय प्रमाणात स्टिल्थ आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे कमी रडार-निरीक्षणक्षमता समाविष्ट आहे. संमिश्र सामग्री, रडार-शोषक कोटिंग्ज आणि कमी-निरीक्षण करण्यायोग्य, रडार-पारदर्शक तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे वर नमूद केलेल्या सामग्रीचा वापर जहाजाला कमी रडार ‘क्रॉस-सेक्शन’ राखण्यात मदत करतो.
‘प्रोजेक्ट १५ बी सुरत’ विनाशिका
‘प्रोजेक्ट १५ बी सुरत’ ही विनाशिका, हे कोलकाता-क्लास (प्रोजेक्ट १५) ए विनाशिकांच्या फॉलो-ऑन क्लासचा अत्युच्च अविष्कार आहे. ज्यामध्ये डिझाइन आणि क्षमतांमध्ये भरीव सुधारणा करण्यात आल्या आहेत. दोन्ही जहाजांची रचना भारतीय नौदलाच्या युद्धनौका डिझाईन ब्युरोने केली होती. ही प्रगत सेन्सर्स आणि शस्त्रास्त्र पॅकेजेसने सुसज्ज आहेत, जी प्रामुख्याने भारतात किंवा आघाडीच्या जागतिक उत्पादकांसोबत धोरणात्मक सहकार्याने विकसित केली गेली आहेत. आधुनिक विमान वाहतूक सुविधांसह सुसज्ज, ‘निलगिरी’ आणि ‘सुरत’मध्ये चेतक, एएलएच, सी किंग आणि नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या ‘एम एच ६० आर’ यासह अनेक हेलिकॉप्टर दिवसा आणि रात्री दोन्ही ऑपरेशन्सदरम्यान ऑपरेट करू शकतात. रेल-लेस हेलिकॉप्टर ट्रॅव्हर्सिंग सिस्टीम आणि व्हिज्युअल एड आणि लँडिंग सिस्टीम यासारखी वैशिष्ट्ये सर्व परिस्थितींमध्ये अखंड ऑपरेशन्स सुरू राहण्यास सहाय्यक ठरणार आहेत. या जहाजांमध्ये महिला अधिकारी आणि खलाशांसाठी विशिष्ट निवासस्थानांचा देखील समावेश आहे. आघाडीच्या लढाऊ भूमिकांमध्ये हे जहाज महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे.
पाणबुडी ‘वाघशीर’
‘वाघशीर’ ही कलवरी-श्रेणी प्रकल्प ७५ अंतर्गत सहावी स्कॉर्पिन-वर्ग पाणबुडी आहे. ही जगातील सर्वात शांत आणि बहुमुखी डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुडींपैकी एक आहे. पृष्ठभागविरोधी युद्ध, पाणबुडीविरोधी युद्ध, गुप्त माहिती गोळा करणे, क्षेत्र निरीक्षण आणि विशेष ऑपरेशन्स यासह विविध मोहिमा हाती घेण्यासाठी या पाणबुडीची रचना करण्यात आली आहे. वायर-मार्गदर्शित टॉर्पेडो, जहाजविरोधी क्षेपणास्त्रे आणि प्रगत सोनार सिस्टीमसह सशस्त्र पाणबुडीमध्ये मॉड्युलर बांधकाम देखील आहे. यामुळे भविष्यातील एअर इंडिपेंडेंट प्रोपल्शन (एआयपी) तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण करणे शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
‘निलगिरी’, ‘सुरत’ आणि ‘वाघशीर’ नौदलात एकत्रित दाखल झाल्याने संरक्षण, स्वावलंबन आणि स्वदेशी जहाजबांधणीमध्ये भारताची अतुलनीय प्रगती दिसून येते. या जहाजांच्या कठोर चाचण्या घेतल्या आहेत. ज्यात यंत्रसामग्री, हुल, अग्निशमन आणि नुकसान नियंत्रण मूल्यांकन, तसेच समुद्रातील सर्व नेव्हिगेशन आणि दळणवळण यंत्रणा सिद्ध करणे याचा सराव करण्यात आला असून ते आता पूर्णपणे कार्यान्वित आणि तैनातीसाठी तयार असल्याचे नौदल अधिकाऱ्यांनी सांगितले.
सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींची उपस्थिती?
या तीन लढाऊ जहाजांच्या समावेशामुळे नौदलाची केवळ सागरी ताकदच वाढणार नाही, तर संरक्षण उत्पादन क्षेत्रातील स्वावलंबनामुळे देशाला या क्षेत्रात नवी दालने खुली होणार आहेत. भारतीय नौदलासाठी आणि संपूर्ण राष्ट्रासाठी हा एक अभिमानाचा क्षण असून याप्रसंगी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यांच्या हस्ते हा सोहळा पार पडावा, यासाठी नौदलाचे प्रयत्न सुरू असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.