
नवी दिल्ली : यंदा फेब्रुवारी, मार्चपासूनच उन्हाच्या तडाख्याने जीव हैराण झालेला असतानाच एप्रिल ते जून या तीन महिन्यांत सूर्य देशात आणखी कोपणार आहे. यंदा कडक उन्हाळ्याचा सामना देशवासीयांना करावा लागणार असून उष्णतेची लाट अनेक राज्यांना हैराण करणार आहे, असा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे.
मध्य व पूर्व भारत, उत्तर-पश्चिम भारताच्या मैदानी भागात अधिक दिवस उष्णतेच्या लाटा येणार आहेत.
भारतीय हवामान खात्याचे प्रमुख मृत्युंजय महापात्रा म्हणाले की, पश्चिम व पूर्व भारतातील काही भाग वगळता देशातील अधिक भागात तापमान सामान्यपेक्षा अधिक राहील. एप्रिल ते जूनपर्यंत उत्तर आणि पूर्व भारताच्या अनेक भागात मध्य भारत आणि उत्तर-पश्चिम भारताच्या पठारी भागात उष्णतेच्या लाटांचा सामना करावा लागेल. अनेक ठिकाणी किमान तापमान सामान्यापेक्षा अधिक राहील.
महाराष्ट्रासह अनेक राज्यांत उष्णतेची लाट
महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, हरयाणा, पंजाब, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओदिशा, छत्तीसगढ, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तमिळनाडूच्या उत्तरेकडे उष्णतेच्या लाटा येणार आहेत.
एप्रिल अधिक तापदायक
यंदाचा एप्रिल महिना भारताच्या अधिक भागात तापमान अधिक राहील. केवळ दक्षिणेकडील काही भाग व वायव्येकडील काही भागात तापमान कमी राहण्याची शक्यता आहे.
विजेची मागणी वाढणार
तज्ज्ञांनी सांगितले की, भारतात यंदा उन्हाळा कडक असणार असल्याने विजेची मागणी ९ ते १० टक्क्यांनी वाढणार आहे. गेल्यावर्षी देशातील विजेची सर्वात जास्त मागणी ३० मे रोजी २५० गिगावॉट झाली होती. हे प्रमाण सरकारने अंदाजित केलेल्या मागणीपेक्षा ६.३ टक्क्याने अधिक होते.