ज्ञानवापीत पूजेला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

ज्ञानवापीत पूजेला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

जुलै २०२३ मध्ये वाराणसी जिल्हा न्यायालयाने भारतीय पुरातत्त्व विभागाला मशिदीमध्ये वैज्ञानिक सर्व्हे करण्याचे निर्देश दिले होते. मशिदीच्या आवारात यापूर्वी हिंदू मंदिर अस्तित्वात होते का? याचे पुरावे शोधण्यासाठी सर्वेक्षण करण्याची परवानगी देण्यात आली होती.

नवी दिल्ली : वाराणसीमधील ज्ञानवापी मशिदीच्या परिसरातील व्यासजी तळघरात सुरू असलेल्या पूजेला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला. गेल्या दोन महिन्यांपासून व्यासजी तळघरात हिंदू भाविक देवाची पूजा आणि आरती करत आहेत. वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या आदेशानंतर १ फेब्रुवारी २०२४ रोजी मशीद परिसरातील बॅरिकेड्स हटवले. त्यानंतर ३० वर्षांनंतर या परिसरात हिंदूंना प्रवेश मिळाला. ३१ जानेवारी या दिवशी न्यायालयाने आदेश दिला की, हिंदू पक्षकार ज्ञानवापी परिसरात पूजाअर्चा करू शकतात. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने पुजारी शैलेंद्र कुमार पाठक व्यास यांना ३० एप्रिलपर्यंत निवेदन द्यायला सांगितले आहे.

दरम्यान, काही मुस्लीम संघटना व्यासजी तळघरातील पूजेच्या आणि त्यासंबंधीच्या वाराणासी जिल्हा न्यायालयाच्या आदेशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेल्या होत्या. त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने सांगितले की, व्यासजी तळघरात होणारी पूजा आणि आरती सुरू ठेवता येईल. त्यावर बंदी घालता येणार नाही.

दरम्यान, न्यायालयाने मुस्लीम पक्षकारांच्या याचिकेवर हिंदू पक्षकारांना नोटीस पाठवली आहे. न्यायालयाने नमूद केले की, आमच्या हस्तक्षेपाशिवाय सध्याच्या ‘जैसे थे’ स्थितीत कोणीही बदल करू नये.

तत्पूर्वी, मुस्लीम पक्षकार वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या आदेशाविरोधात अलाहाबाद उच्च न्यायालयातही गेले होते. अलाहाबाद उच्च न्यायालयाने मुस्लीम पक्षकारांची मागणी फेटाळली होती. तसेच व्यासजी तळघरात चालू असलेल्या पूजा आणि आरतीवर बंदी घालण्यास नकार दिला होता.

जुलै २०२३ मध्ये वाराणसी जिल्हा न्यायालयाने भारतीय पुरातत्त्व विभागाला मशिदीमध्ये वैज्ञानिक सर्व्हे करण्याचे निर्देश दिले होते. मशिदीच्या आवारात यापूर्वी हिंदू मंदिर अस्तित्वात होते का? याचे पुरावे शोधण्यासाठी सर्वेक्षण करण्याची परवानगी देण्यात आली होती. वाराणसीमधील प्रसिद्ध काशी विश्वनाथ मंदिराच्या बाजूला ज्ञानवापी मशीद आहे. याच ज्ञानवापी मशीद परिसरात अगोदर मंदिर होते, असा दावा केला जातो; तर मुस्लीम पक्षकाराने अनेकदा हा दावा फेटाळून लावला आहे. हा वाद सध्या न्यायालयात पोहोचलेला आहे.

logo
marathi.freepressjournal.in