‘नीट-यूजी’ परीक्षा रद्द करण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली

मोठ्या प्रमाणावर झालेले गैरप्रकार आणि अनियमितता यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेली ‘नीट-यूजी २०२४’ परीक्षा रद्द करावी व फेरपरीक्षा घ्यावी, अशी मागणी करणाऱ्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावल्या.
‘नीट-यूजी’ परीक्षा रद्द करण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली
Published on

नवी दिल्ली : मोठ्या प्रमाणावर झालेले गैरप्रकार आणि अनियमितता यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेली ‘नीट-यूजी २०२४’ परीक्षा रद्द करावी व फेरपरीक्षा घ्यावी, अशी मागणी करणाऱ्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावल्या. पेपरफुटी पद्धतशीरपणे करण्यात आली आहे अथवा अन्य गैरप्रकार झाले आहेत, असे स्पष्ट दर्शविणारे कोणतेही पुरावे समोर आलेले नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावताना स्पष्ट केले.

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील न्या. जे. बी. पारडीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या पीठाने जवळपास चार दिवस सॉलिसिटर जनरल यांच्यासह अन्य ज्येष्ठ वकिलांचा युक्तिवाद ऐकला. लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून पीठाने निकालाचा आवश्यक भाग जाहीर केला आणि सविस्तर निकाल कालांतराने जाहीर करणार असल्याचे सांगितले.

‘नीट-यूजी २०२४’ परीक्षेच्या निकालामध्ये गडबड झाली आहे अथवा पद्धतशीरपणे उल्लंघन झाले असल्याचा पुरावा समोर आलेला नाही, असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी म्हटले आहे. हजारीबाग आणि पाटणा येथे जे पेपर फुटले त्याबद्दल वाद नसल्याचे पीठाने म्हटले आहे.

‘नीट-यूजी’मध्ये मोठ्या प्रमाणावर झालेल्या गैरप्रकारांमुळे सध्या केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि एनटीए हे राजकीय वादाचे आणि विद्यार्थ्यांकडून करण्यात आलेल्या निदर्शनांचे केंद्रबिंदू बनले आहे.

...आणि सरन्यायाधीशांनी सुरक्षा यंत्रणेला केले पाचारण

नीट-यूजी प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि ज्येष्ठ वकील मॅथ्यूज नेदुम्परा यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर चंद्रचूड यांनी नेदुम्परा यांना चांगलेच झापले आणि त्यांना न्यायालयाबाहेर नेण्याचे आदेश सुरक्षा यंत्रणेला दिले. नेदुम्परा हे एका याचिकाकर्त्याच्यावतीने युक्तिवाद करीत होते, त्यांनी दुसऱ्या एका याचिकाकर्त्याचे वकील नरेंद्र हुडा यांचा युक्तिवाद सुरू असताना त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा चंद्रचूड यांनी नेदुम्परा यांना हुडा यांचा युक्तिवाद संपल्यानंतर बोलण्यास सांगितले. आपण या न्यायालयात हजर असलेल्या वकिलांपैकी सर्वात ज्येष्ठ वकील आहोत, आपण उत्तर देऊ शकतो, आपण न्यायमित्र आहोत, असे नेदुम्परा म्हणाले. तेव्हा आपण न्यायमित्राची नियुक्ती केलेली नाही, असे सरन्यायाधीश म्हणाले. त्यावर तुम्ही आपला आदर राखला नाहीत तर आपण न्यायालयातून बाहेर जाऊ, असे नेदुम्परा म्हणाले. त्यानंतर सरन्यायाधीशांनी नेदुम्परा यांना इशारा दिला आणि सुरक्षा यंत्रणेला पाचारण करून नेदुम्परा यांना न्यायालयाबाहेर घेऊन जाण्याचे आदेश दिले.

logo
marathi.freepressjournal.in