‘नीट-पीजी’ परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली

‘नीट-पीजी’ची ११ ऑगस्ट रोजी घेण्यात येणारी परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी करणारी याचिका शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.
‘नीट-पीजी’ परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली
संग्रहित फोटो
Published on

नवी दिल्ली : ‘नीट-पीजी’ची ११ ऑगस्ट रोजी घेण्यात येणारी परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी करणारी याचिका शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. उमेदवारांना परीक्षेसाठी जी शहरे देण्यात आली आहेत, तेथे पोहोचणे फारच गैरसोयीचे असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला होता.

केवळ पाच विद्यार्थ्यांसाठी आपण दोन लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य संकटात टाकू शकत नाही, असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. जे. बी. पारडीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या पीठाने स्पष्ट केले. आम्ही ही परीक्षा कशी पुढे ढकलू शकतो, अलीकडे कोणीही येतो आणि परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करतो, आम्ही शिक्षणतज्ज्ञ नाही, असेही पीठाने म्हटले आहे.

२ लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य संकटात टाकू शकत नाही

तात्त्विक बाब म्हणून आम्ही परीक्षेचे नवे वेळापत्रक जाहीर करू शकत नाही. आम्ही परीक्षा जर पुढे ढकलली तर दोन लाख विद्यार्थी आणि चार लाख पालक अश्रू ढाळतील. आम्ही इतक्या विद्यार्थ्यांचे भवितव्य संकटात टाकू इच्छित नाही. अशा प्रकारच्या याचिका दाखल करण्यामागे कोणाचा हात आहे त्याची आम्हाला कल्पना नाही, असेही पीठाने म्हटले आहे.

‘नीट-पीजी’ परीक्षा पुढे ढकलण्याची गरज आहे. कारण एक परीक्षा सकाळच्या सत्रात आहे, तर दुसरी परीक्षा दुपारच्या सत्रात आहे, असे याचिकाकर्त्याच्या वकिलांनी सांगितले. अनेक उमेदवारांना परीक्षेसाठी जी शहरे देण्यात आली आहेत. तेथे पोहोचणे त्यांच्यासाठी फारच गैरसोयीचे आहे. परीक्षेसाठीची शहरे ३१ जुलै रोजी घोषित करण्यात आली आणि विशिष्ट केंद्रांची घोषणा ८ ऑगस्ट रोजी करण्यात आली, असेही वकिलांनी सांगितले. ही परीक्षा सर्वप्रथम २३ जून रोजी घेण्यात येणार होती.

logo
marathi.freepressjournal.in