व्हॅलेंटाइन दिनाआधी बॅड न्यूज! चॉकलेटचा ‘गोडवा’ घटणार

सणासुदीला आपल्या स्नेहीजनांना अन्य पारंपरिक मिठायांबरोबरच विविध प्रकारचे चॉकलेट्स वाटणे आता परदेशांप्रमाणेच भारतातही रूढ झाले आहे.
व्हॅलेंटाइन दिनाआधी बॅड न्यूज! चॉकलेटचा ‘गोडवा’ घटणार

लंडन : जगभरचे प्रेमवीर आपल्या जोडीदाराला चॉकलेट देऊन नात्यातील गोडवा वाढवण्याच्या तयारीत असतानाच ऐन व्हॅलेंटाइन दिनाच्या पूर्वसंध्येला चॉकलेटचा 'गोडवा' घटण्याच्या बेतात आहे. चॉकलेट बनवण्यासाठी आवश्यक असलेल्या कोकोचा पुरवठा यंदा घटल्याने चॉकलेटचे भाव वाढणार आहेत.

सणासुदीला आपल्या स्नेहीजनांना अन्य पारंपरिक मिठायांबरोबरच विविध प्रकारचे चॉकलेट्स वाटणे आता परदेशांप्रमाणेच भारतातही रूढ झाले आहे. दिवाळी, नाताळ, नववर्ष, व्हॅलेंटाइन डे अशा निमित्ताने चॉकलेट्सचा खपही वाढलेला दिसतो. डार्क चॉकलेट, व्हाइट चॉकलेट या मूलभूत प्रकारांबरोबरच चॉलेट्सच्या साथीने ड्रायफ्रुट्स आणि फळांचे कॉम्बिनेशन्सही तरुणाईत प्रसिद्ध आहेत. चॉकलेट्स बनवण्यासाठी कोको हा पदार्थ आवश्यक असतो. त्याच्या बियांचे उत्पादन प्रामुख्याने आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील देशांमध्ये होते. तेथील घाना, आयव्हरी कोस्ट आदी देश जागतिक स्तरावर कोकोच्या उत्पादनात अग्रेसर आहेत. मात्र, यंदा अल-निनो परिणामामुळे हवामानात झालेले बदल कोकोच्या उत्पादनाला मारक ठरले आहेत. तापमानातील वाढ आणि पावसाची अनिश्चितता यामुळे कोकोचे पीक घटले आहे.

बाजारातील आवक घटल्याने कोकोचे दर गेल्या वर्षभरात दुप्पट झाले आहेत. शुक्रवारी न्यूयॉर्कच्या वायदेबाजारात एक टन कोकोचा दर आजवरच्या उच्चांकावर, म्हणजे ५,८७४ डॉलर्सवर गेला होता. कोकोबरोबरच साखरेचेही भाव वाढल्याने ब्रिटनमध्ये डिसेंबर महिन्यात काही चॉकलेटच्या दरांत ५० टक्के वाढ झाली होती. नोव्हेंबरमध्ये ब्रिटनमधील अन्नधान्य महागाईचा दर ८.३ टक्के होता. त्यावेळी चॉकलेट्सची भाववाढ मात्र १५.३ टक्क्यांनी होत होती. परिणामी ग्राहकांनी चॉकलेट्सकडे पाठ फिरवण्यास सुरुवात केली आहे. हर्शे या जागतिक पातळीवरील चॉकलेट उत्पादन कंपनीने ३१ डिसेंबरला जाहीर केलेल्या तिमाही ताळेबंदानुसार कंपनीच्या नफ्यात ६.६ टक्के घट झाली होती. कॅडबरी या प्रसिद्ध ब्रँडच्या चॉकलेट्सची निर्मिती करणाऱ्या माँडिलेझ या कंपनीनेही यंदाच्या वर्षाच्या चॉकलेट्सचे दर वाढण्याचे संकेत दिले आहेत.

भारतातील उत्पादकांचा फायदा

भारतात केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांत कोको आणि रबराचे उत्पादन होते. गेल्या काही महिन्यांत रबराचे दर घटू लागल्याने उत्पादक अडचणीत आले होते. पण आता जागतिक बाजारात कोकोचे दर वाढू लागल्याने दक्षिण भारतातील रबर उत्पादकांनी कोकोकडे लक्ष वळवले आहे. कोकोच्या व्यापारातून अधिक नफा कमावण्यासाठी ते सज्ज झाले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in