संयुक्त राष्ट्रांना मदत सुरू ठेवा! गुटेरस यांचे दात्यांना आवाहन; इस्रायलच्या आरोपांवर कार्यवाहीची हमी

संयुक्त राष्ट्रांच्या विविध उपक्रमांना आर्थिक मदत कायम ठेवण्याचे आवाहन संस्थेचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस यांनी दात्या देशांना केले
संयुक्त राष्ट्रांना मदत सुरू ठेवा! गुटेरस यांचे दात्यांना आवाहन; इस्रायलच्या आरोपांवर कार्यवाहीची हमी

राफा : गाझा पट्टीत काम करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या विविध उपक्रमांना आर्थिक मदत कायम ठेवण्याचे आवाहन संस्थेचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस यांनी दात्या देशांना केले आहे. तसेच इस्रायलने केलेल्या आरोपांवर कार्यवाही करण्याची हमी दिली आहे.

युनायटेड नेशन्स रिलिफ अँड वर्क्स एजन्सी (यूएनआरडब्ल्यूए) या संस्थेच्या १२ कर्मचाऱ्यांवर इस्रायलने थेट हमासला मदत केल्याचे आरोप केले आहेत. त्यानंतर यापैकी ९ जणांना बडतर्फ करण्यात आले आहे, एकाचा मृत्यू झाला आहे आणि उर्वरित दोघांची ओळख पटवली जात आहे, असा खुलासा संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस यांनी केला आहे. तसेच आर्थिक मदत रोखलेल्या देशांनी ती पूर्ववत सुरू करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

हमासने ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलवर केलेल्या हल्ल्यात गाझा पट्टीत काम करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या कर्मचाऱ्यांनी मदत केली होती, असा आरोप इस्रायलने नुकताच केला. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचे वरिष्ठ सल्लागार मार्क रेगेव्ह यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यामांतून हे आरोप केले होते. हमासने इस्रायलवर हल्ला करण्यासाठी गाझा पट्टीतील संयुक्त राष्ट्रांच्या कर्मचाऱ्यांची वाहने आणि इमारती वापरल्या, असे इस्रायलने म्हटले आहे. तसेच हमासच्या तावडीतून सुटलेल्या इस्रायलच्या एका महिला ओलिसाने सांगितले आहे की, तिला हमासने गाझा पट्टीत काम करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या कर्मचाऱ्याच्या घरात डांबून ठेवले होते. गाझा पट्टीतील संयुक्त राष्ट्रांचे अनेक कर्मचारी संयुक्त राष्ट्रांकडून पगार घेतात आणि काम हमाससाठी करतात, असा आरोप इस्रायलने केला आहे.

आठ देशांनी निधी रोखला

इस्रायलच्या आरोपांनंतर ऑस्ट्रेलिया, कॅनडा, फिनलंड, जर्मनी, इटली, नेदरलँड्स, ब्रिटन आणि अमेरिका या देशांनी त्यांच्याकडून संयुक्त राष्ट्रांना दिली जाणारी आर्थिक मदत बंद केली. गाझा पट्टीतील एकूण २३ लाख लोकसंख्येपैकी दोन तृतीयांश लोक संयुक्त राष्ट्रांच्या मदतीवर अवलंबून आहेत. युनायटेड नेशन्स रिलिफ ॲण्ड वर्क्स एजन्सी (यूएनआरडब्ल्यूए) ही संस्था गाझा पट्टीसह वेस्ट बँक, जॉर्डन, लेबॅनन आणि सीरियात आरोग्य, शिक्षण आणि अन्य मानवतावादी सेवा पुरवते. त्यांचे सुमारे १३ हजार कर्मचारी गाझा पट्टीत काम करतात. त्यावर आता परिणाम होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in