हेलसिंकी : संयुक्त राष्ट्रांचा ‘वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट २०२४’ बुधवारी जाहीर झाला असून त्यात सलग सातव्या वर्षी फिनलंडने जगात पहिला क्रमांक पटकावला आहे. आनंदीपणाच्या बाबतीत भारत यंदाही मागेच असून या यादीत देशाचे स्थान गतवर्षीप्रमाणेच १२६वे आहे. आश्चर्याची बाब म्हणजे गतवर्षी ऑक्टोबरपासून हमासबरोबर युद्ध सुरू असूनही इस्रायलने आनंदाच्या जागतिक क्रमवारीत पाचवे स्थान पटकावले आहे.
सर्वांनाच आनंदी राहण्यास आवडते. पण आनंदी राहणे सर्वांनाच जमत नाही. प्रत्येकाच्या आनंदाच्या व्याख्या आणि कल्पना वेगवेगळ्या असतात. त्या पूर्ण करण्यासाठी सर्वच लोक पुरेसे प्रयत्न करताना दिसत नाहीत. आपल्या आजूबाजूची परिस्थितीही बरेचदा त्याला जबाबदार असते. प्रत्येक देशातील स्थिती वेगवेगळी असल्याने नागरिकांच्या आशा-आकांक्षा पूर्ण होण्याची शक्यताही वेगवेगळी असते. या सर्व बाबींचा विचार करून संयुक्त राष्ट्रांकडून जागतिक आनंदीपणाचा निर्देशांक जाहीर केला जातो. तो बनवताना १४३ देशांतील स्थितीचा आढावा घेतला आहे. त्यात नागरिकांच्या समाधानाचे प्रमाण, देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर, सामाजिक निर्देशांक, आरोग्याच्या सुविधा, स्वातंत्र्य, लोकांचे दातृत्व, भ्रष्टाचार आदी बाबींचा विचार केला जातो. या यादीत गेली अनेक वर्षे युरोपच्या उत्तरेकडील स्कँडेनेव्हियन किंवा नॉर्डिक देश अव्वल ठरत आहेत. यंदाही या यादीत फिनलंडचे नाव सर्वप्रथम आहे. तर त्याच्या पाठोपाठ डेन्मार्क, आईसलँड आणि स्वीडन यांचा क्रमांक लागतो. तर गेली अनेक वर्षे संघर्षग्रस्त असलेला अफगाणिस्तान या यादीत सर्वांत खालच्या म्हणजे १४३व्या स्थानावर आहे.
अमेरिका, जर्मनीही पहिल्या २० जणांच्या यादीत नाहीत
यंदा प्रथमच अमेरिका आणि जर्मनी यांना यादीतील पहिल्या २० देशांमध्येही स्थान मिळवता आलेले नाही. अमेरिका आणि जर्मनी यंदा अनुक्रमे २३ आणि २४व्या स्थानावर फेकले गेले आहेत. तर त्यांच्या तुलनेत चांगली कामगिरी करून कोस्टारिका आणि कुवेत यांना यादीत १२ आणि १३वे स्थान मिळाले आहे.
देशाच्या लोकसंख्येचा आनंदाशी संबंध नाही
देशाचा विस्तार आणि लोकसंख्येचा आकार याचाही आनंदाशी फारसा संबंध नसल्याचे यंदा दिसून आले आहे. यादीतील पहिल्या १० देशांमधील केवळ नेदरलँड्स आणि ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या १५ दशलक्षाहून अधिक आहे. तर पहिल्या २० देशांमध्ये केवळ कॅनडा आणि ब्रिटन यांची लोकसंख्याच ३० दशलक्षांहून जास्त आहे.
संघर्षग्रस्त देश पिछाडीवर
ज्या देशांत अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे त्यांचे यादीतील स्थान घसरल्याचेही दिसून येत आहे. २००६ ते २०१० दरम्यानच्या काळापासून अफगाणिस्तान, लेबॅनन, जॉर्डन यांच्यासह सर्बिया, बल्गेरिया, लाटव्हिया आदी पूर्व युरोपीय देशांचेही स्थान गेल्या काही वर्षांत खाली आले आहे. तसेच विविध देशांमधील आनंदी नागरिकांच्या प्रमाणामध्ये असलेली तफावतही चिंताजनक असल्याचे अहवालकर्त्यांनी नमूद केले आहे.