धर्माचे पाणी आणि राजकारणाचे मळे

भारतीय जनता पक्षाच्या राजकीय प्रवासात राम मंदिराच्या मुद्द्याने मोठा हात दिला आहे.
धर्माचे पाणी आणि राजकारणाचे मळे

सचिन दिवाण : गेल्या काही वर्षांत जगभरात धर्माच्या पाण्यावर राजकारणाचे मळे फुलवण्याचे प्रकार वाढताना दिसत आहेत. देशोदेशींच्या शासकांनी सत्ता मिळवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी धार्मिक भावनांचा आधार घेतल्याची अनेक उदाहरणे आजूबाजूला दिसतात. धार्मिक भावनांना फुंकर घालून लोकांपुढे मोठमोठाली प्रतीके उभी केली की त्यांच्या झगमगाटात खरे जगण्यामरणाचे प्रश्न झाकोळले जातात. सत्तेचा मार्ग मंदिराच्या गाभाऱ्यातून जातो, हे गमक शासनकर्त्यांनी अचूक हेरले आहे. या जल्लोषात मशगुल होऊन लोकांच्या झुंडीही मग आपापल्या संस्कृतीचे गोडवे गाण्यात रममाण होतात. क्वचितप्रसंगी त्यातून रक्तरंजित संघर्षही उभे राहतात. भारताप्रमाणेच अन्य देशातील राजकारण्यांनीही धर्माचा असाच वापर केलेला आढळून येतो.

राम मंदिर आणि भाजप

भारतीय जनता पक्षाच्या राजकीय प्रवासात राम मंदिराच्या मुद्द्याने मोठा हात दिला आहे. १९८४ सालच्या लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या अवघ्या दोन जागांवरून २०१९ साली ३०३ जागांपर्यंतचा प्रवास भाजपने रामाचा हात धरूनच केला आहे. देशात आणीबाणीनंतर जनसंघाची झालेल्या पडझडीतून भाजप आकार घेत होता. भाजपला १९८४ साली संसदेत केवळ २ जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर पक्षाने १९८९ साली लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली पालमपूर ठराव करून राम मंदिराचा मुद्दा हाताळण्यास सुरुवात केली आणि त्याच वर्षी भाजपच्या खासदारांची संख्या ८५ पर्यंत वाढली. १९९०च्या दशकाच्या सुरुवातीला देशभरात धर्माच्या राजकारणाचे वारे जोरात वाहत होते. मंडल आयोगावरून वातावरण तापले होते. तेव्हा अडवाणींनी गुजरातमधील सोमनाथ मंदिरापासून अयोध्येपर्यंत रथयात्रा काढली. १९९१ साली भाजपने संसदेत १२० जागा मिळवल्या. बाबरी मशिदीचे १९९२ साली पतन झाले आणि १९९६ साली भाजपची खासदारसंख्या १६१ वर पोहोचली. तेथून पुढेही राममंदिर आणि भाजपचा राजकीय प्रवास बराचसा समांतर झालेला दिसतो. यंदाही येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राम मंदिरात मूर्तीची प्रतिष्ठापना करून भाजप मतांची बेगमी करू पाहत आहे.

तक्सीम मशीद आणि एर्दोगान …

तुर्कस्तान हा मुस्लीम जगातील तुलनेने पुढारलेला देश. अतातुर्क केमाल पाशा यांनी त्याच्या धर्मनिरपेक्षता आणि आधुनिकीकरणाचा पाया रचला होता. मात्र, सध्याचे अध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगान यांनी ती परंपरा मोडीत काढण्यास सुरुवात केली आहे. एर्दोगान आणि ‘एके पार्टी’ यांचा प्रवासही असाच एका धार्मिक प्रकल्पाच्या साथीने झाला आहे. एर्दोगान १९९४ साली इस्तंबूलचे महापौर बनले तेव्हा त्यांनी शहराच्या तक्सीम चौकाकडे बोट दाखवून जाहीरपणे सांगितले होते की, ते तेथे भव्य मशीद बांधतील. आज नेमक्या त्याच ठिकाणी भव्य तक्सीम मशीद उभी आहे. वास्तविक इस्तंबूलमध्ये हाजिया सोफिया आणि ब्लू मॉस्क अशा दोन भव्य मशिदी पूर्वीपासून प्रसिद्ध आहेत. पण एर्दोगान यांनी तक्सीम मशिदीचा प्रकल्प रेटून नेला. या मशिदीचे बांधकाम २०१७ साली सुरू झाले आणि २०२१ साली तो प्रकल्प पूर्ण झाला. या दरम्यान एर्दोगानही एक लष्करी बंड चिरडून तिसऱ्यांदा देशाचे अध्यक्ष बनले आहेत. त्यांनी देशाचे नावही तुर्किये असे करून टाकले आहे.

अल-अक्सा मशीद

जेरूसलेममधील अल-अक्सा मशीद इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्षाचे मूळ आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू मशिदीचे अस्तित्व संपवण्याच्या तयारीत आहेत, मशिदीच्या बाजूने ज्यू वस्ती वाढवून तो भाग बळकावण्याचा प्रयत्न आहे, मशिदीत इस्रायलच्या सैनिकांनी ज्यू प्रार्थना म्हटली, असे आरोप करत हमासने ७ ऑक्टोबर २०२३ रोजी ऑपरेशन अल-अक्सा नावाने इस्रायलवर हल्ला केला.

वली-ए-असर मशीद

इराणची राजधानी तेहरानमधील वली-ए-असर मशीद २०१८ साली पूर्ण झाली. रझा दानेश्मीर आणि कॅथरीन स्पिरिडोनॉफ यांनी तिची आधुनिक फ्लुईड मोशन तंत्रावर आधारीत रचना केली आहे. मात्र, तिला मिनार किंवा घुमट नाही. त्यामुळे इराणच्या कर्मठ धार्मिकांनी तेथे प्रार्थना करण्यास नकार दिला. अखेर तेथील धार्मिक कामकाज थांबवावे लागले.

भाजपला ताकद देणारे राम मंदिर

निवडणूक भाजप मतांची

खासदार टक्केवारी

संख्या

१९८४ ०२ ७.२

१९८९ ८५ ११.१

१९९१ १२० १९.५

१९९६ १६१ १९.८

१९९८ १८२ २५.१

१९९९ १८२ २३.३

२००४ १३८ २२.२

२००९ ११६ १८.८

२०१४ २८२ ३१.३४

२०१९ ३०३ ३७.४

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in