पुढील पाच दिवस हुडहुडी वाढणार

पुढील काही दिवस थंडीची लाट कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाने म्हणजेच आयएमडीने अनेक राज्यांना थंडी आणि धुक्याचा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
पुढील पाच दिवस हुडहुडी वाढणार

नवी दिल्ली : काश्मीरच्या गुलबर्ग भागात यंदा बर्फ पडला नसला तरी देशात थंडीचा जोर आता वाढला आहे. यामुळे देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये बऱ्यापैकी थंडी पडली आहे. आयएमडीच्या माहितीनुसार वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशाच्या हवामानात पुन्हा एकदा बदल होण्याची शक्यता आहे. देशाच्या उत्तरेकडे थंडी आणि दाट धुके पाहायला मिळतेय, तर काश्मीर खोऱ्यात बर्फवृष्टी होत आहे. पुढील काही दिवस थंडीची लाट कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाने म्हणजेच आयएमडीने अनेक राज्यांना थंडी आणि धुक्याचा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आगामी पाच दिवस उत्तर भारतात दाट धुक्याची शक्यता आहे. पर्वतमय प्रदेशात सुरु असलेल्या बर्फवृष्टीमुळे मैदानी भागातील तपमान देखील घसरण्याची शक्यता आहे. यामुळे उत्तर भारतातील जनतेला पुढील पाच दिवस थंडी आणि धुक्यातून दिलासा मिळण्याची शक्यता नाही. दाट धुक्यामुळे दृष्यमानता कमी झाली आहे, त्यामुळे वाहन चालकांना प्रशासनाकडून सावधगिरीचे आवाहन केले जात आहे. दृष्यमानता कमी झाल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. दिल्लीतील अनेक ट्रेन रद्द करण्यात आल्या असून विमान उड्डाणेही उशिराने सुरु आहेत. दिल्लीत थंडीची लाट कायम असून मंगळवारी थंडीसह दाट धुक्याची चादर पाहायला मिळाली. दाट धुक्यामुळे विमान वाहतुकीवर परिणाम होत आहे, तर दुसरीकडे रेल्वे वाहतूकही विस्कळीत झाली आहे. राजधानी एक्स्प्रेससारख्या गाड्याही १५ तासांहून अधिक उशिराने धावत आहेत. पालम विमानतळावर सकाळी ७ वाजता १०० मीटर दृश्यमानता नोंदवली गेली, तर सकाळी साडेसात वाजता दृष्यमानता शून्य मीटरवर घसरली होती. सफदरजंग विमानतळावर सकाळी सात आणि साडेसात वाजता ५० मीटरपर्यंत दृश्यमानता नोंदवण्यात आल्याची माहितीही देण्यात आली. दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्यामुळे गेल्या तीन दिवसांत दिल्ली विमानतळावर एक हजाराहून अधिक उड्डाणे १२ तासांपेक्षा जास्त उशीर झाला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in