आता विधवेच्या मुलांनाही दुसऱ्या पतीच्या संपत्तीत वारसा हक्क मिळणार

हिंदू वारसा नियमाच्या कलम १५ नुसार, हिंदू विधवा आपल्या दुसऱ्या पतीकडून स्वत:साठी मालमत्ता मिळवू शकते
आता विधवेच्या मुलांनाही दुसऱ्या पतीच्या संपत्तीत वारसा हक्क मिळणार
Published on

विधवेचा मृत्यू झाल्यास दुसऱ्या पतीच्या संपत्तीत तिच्या मुलांना वारसा हक्क मिळेल, असा महत्त्वपूर्ण निकाल गुजरात हायकोर्टाने दिला आहे. न्या. ए. पी. ठाकर यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला.

हिंदू वारसा नियमाच्या कलम १५ नुसार, हिंदू विधवा आपल्या दुसऱ्या पतीकडून स्वत:साठी मालमत्ता मिळवू शकते. तसेच पहिल्या विवाहातून झालेल्या मुलांनाही दुसऱ्या पतीच्या संपत्तीत वाटा देऊ शकते. माखनभाई पटेल यांनी आपली पत्नी कुंवरबेन आणि आपल्या दोन मुलांना संपत्तीचे वारस म्हणून नामांकित केले. १९८२ मध्ये महसूल विभागाच्या दप्तरात त्याची नोंद केली. त्यानंतर कुंवरबेनने आपल्या पहिल्या विवाहातून झालेल्या मुलाला मालमत्ता देण्याचे मृत्युपत्रात नमूद केले.

त्यानुसार कुंवरबेन यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलांनी माखनभाई यांच्या संपत्तीत दावा केला; मात्र तहसीलदार व उपजिल्हाधिकारी यांनी महसूल खात्याच्या दफ्तरात त्यांच्या मालमत्तेवर नाव लावण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांना हायकोर्टात दावा लावावा लागला. याचिकाकर्त्यांनी सांगितले की, कुंवरबेन ही संपत्तीची पूर्ण मालक बनली होती. त्यामुळे तिच्या इच्छेनुसार, मालमत्तेचे वितरण करण्याचा अधिकार होता. तसेच १९८२मध्ये कोणीही उत्तराधिकाऱ्याला आव्हान दिले नाही. त्यामुळे महसूल अधिकाऱ्यांनी मृत्युपत्रानुसार निर्णय घ्यायचा होता. एजीपीनी सांगितले की, मृत्युपत्रानुसार नागरिकांच्या अधिकारांचा निर्णय हा केवळ दिवाणी न्यायालयानुसार होऊ शकतो. कुंवरबेन यांचा विवाह एका व्यक्तीशी झाला होता. यातून त्यांच्या मुलाचा जन्म झाला. त्यानंतर त्यांनी माखनभाई यांच्यासोबत दुसरे लग्न केले.

logo
marathi.freepressjournal.in