बोगद्यात अडकलेल्या कामगारांची चिंता वाढली यंत्रांनी नीट काम केल्यास दोन दिवसांत सुटका - गडकरी

उत्तराखंडमधील बांधकाम सुरू असलेल्या सिलक्यारा बोगद्याचा काही भाग कोसळल्याने ४१ कामगार गेला आठवडाभर जमिनीखाली अडकून पडले आहेत
बोगद्यात अडकलेल्या कामगारांची चिंता वाढली
यंत्रांनी नीट काम केल्यास दोन दिवसांत सुटका - गडकरी

नवी दिल्ली : उत्तराखंडमधील सिलक्यारा येथील बोगद्यात झालेल्या अपघातामुळे अडकून पडलेल्या ४१ कामगारांच्या जीवाची आता चिंता वाढली आहे. हे कामगार गेल्या आठ दिवसांपासून बोगद्यात अडकून पडले आहेत. त्यांना अन्न, पाणी, ऑक्सीजनसह औषधेही पुरवली जात आहेत. सुटकेसाठी शक्य ते सर्व पर्याय तपासून पाहिले जात आहेत. बोगद्याच्या वरील बाजूस पोहोचण्यासाठी बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन (बीआरओ) रस्ता बांधत आहे. तेथून उभे ड्रिलिंग केले जाईल. जमीन पोखरणाऱ्या यंत्रानी व्यवस्थित काम केल्यास येत्या दोन ते अडीच दिवसांत अडकलेल्या कामगारांची सुटका होऊ शकेल, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी दिली.

उत्तराखंडमधील बांधकाम सुरू असलेल्या सिलक्यारा बोगद्याचा काही भाग कोसळल्याने ४१ कामगार गेला आठवडाभर जमिनीखाली अडकून पडले आहेत. त्यांच्या सुटकेसाठी केलेले आतापर्यतचे प्रयत्न असफल ठरले. मात्र, कोसळलेल्या दगड-मातीच्या ढिगाऱ्यातून ४ इंच व्यासाचा पाइप सोडून कामगारांपर्यंत अन्न, पाणी आजी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा पहिल्या दिवसापासून केला जात आहे. तेवढ्यावर कामगार आठवडाभर तग धरून आहेत. मात्र, त्यांना अधिक ऊर्जा मिळावी यासाठी सुका मेवा, मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या आणि मनोधैर्य खचू नये म्हणून अँटि-डिप्रेसंट औषधे आत पोहोचवली जात आहेत. कामगारांना बाहेर काढण्यासाठी ढिगाऱ्यातून तीन फूट व्यासाचा पाइप आत सोडण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

यासह बोगद्याच्या वरील भागातून कामगार अडकलेल्या भागापर्यंत उभे ड्रिलिंग केले जाणार आहे. त्यासाठी ड्रिलिंग यंत्रे डोगरावर नेणे गरजेचे आहे. ते शक्य व्हाव्हे म्हणून बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन (बीआरओ) डोंगराच्या वरील भागापर्यंत रस्ता तयार करत आहे. या सर्व यंत्रणांनी नीट काम केले तर दोन ते अडीच दिवसांत अडकलेल्या कामगारांची सुटका होऊ शकेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in