नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात सभागृहात आणि सभागृहाबाहेर जे घडले त्याबद्दल राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जग आपल्या लोकशाहीकडे पाहत आहे, असे धनखड यांनी म्हटले आहे.
हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयक, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. आंबेडकर यांच्याबद्दल केलेले वक्तव्य आणि सत्तारूढ आणि विरोधी सदस्यांमध्ये संसदेच्या संकुलात झालेली धक्काबुक्की या प्रकरणांमुळे चांगलाच गाजला.
धनखड यांनी अधिवेशन काळातील खासदारांच्या वर्तनावर नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, जग आपल्या लोकशाहीकडे पाहते. तरीही आपण आपल्या आचरणातून नागरिकांच्या अपेक्षा खोट्या ठरवतो. संसदेतील आपल्या वर्तनातून आपण जनतेच्या विश्वासाची आणि अपेक्षांची खिल्ली उडवत आहोत. आपले मूलभूत कर्तव्य नागरिकांची सेवा करणे आहे, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करत आहोत.
सभापती पुढे म्हणाले की, जिथे तर्कसंगत संवाद व्हायला पाहिजे, तिथे आपण अराजकता पाहत आहोत. प्रत्येक खासदाराला, तो कोणत्या पक्षाचा आहे याचा विचार न करता आवाहन करतो की, त्यांनी एकदा या सर्वांचा सद्सदविवेकबुद्धीने विचार करावा. धनखड यांच्या या भावना उपराष्ट्रपतींच्या अधिकृत ‘एक्स’ खात्यावर टाकण्यात आल्या आहेत.