
रामेश्वरम : तमिळनाडूतील अनेक नेत्यांची पत्र मला येतात. या पत्राखालील सही इंग्रजी भाषेत केलेली असते. भाषाभिमान बाळगता तर किमान तमिळ भाषेत सही तरी करा, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्रमुक नेत्यांना लगावला.
नवीन शिक्षण धोरण व त्रिभाषेवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्रमुक नेत्यांना रविवारी चांगलेच सुनावले.
मोदी यांनी रामेश्वरम येथे आशियातील पहिल्या उभ्या लिफ्ट रेल्वे पुलाचे आणि इतर योजनांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी झालेल्या सभेत मोदी म्हणाले की, मुख्यमंत्री व द्रमुक नेत्यांनी वैद्यकीय शिक्षण तमिळ भाषेत करावे. तमिळ नेत्यांची अनेक पत्र माझ्याकडे येतात. तेव्हा त्यात कोणताही नेता तमिळ भाषेत सही करत नाही. या नेत्यांनी तमिळमध्ये सही करावी. त्यामुळे तमिळचा गौरव वाढेल, असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, आज रामनवमीच्या पवित्र दिवशी मी रामेश्वरम येथे आहे. येथे पंबन ब्रीजचे उद्घाटन झाले. १०० वर्षांपूर्वी ज्याने ब्रीज बनवला होता, तो गुजरातमध्ये जन्मला होता. आता नवीन ब्रीजचे उद्घाटन ज्याने केले तोही गुजरातमध्ये जन्माला आला आहे, असा हा आगळा योगायोग आहे.
आज भाजपचा स्थापना दिवस आहे. त्यामुळे माझ्यासाठी ही बाब भावूक करणारी आहे. विकसित व समृद्ध भारताचे स्वप्न पाहून आम्ही पुढे चाललो आहोत. तीन ते चार पिढ्यांनी जे परिश्रम घेतले, त्यातून भाजप उभा राहिला. भाजपच्या विचाराने आम्हाला हे काम करण्याची संधी दिली, असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, देशातील जनता आता भाजप सरकारची चांगली कामे पाहत आहे. आज प्रत्येक भारतीय माणसाची छाती अभिमानाने फुलून जात आहे. देशातील प्रत्येक राज्यातील भाजप कार्यकर्ता जमिनीवर राहून सेवा करत आहे. मी त्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो.
भारताबाबत जगाचे आकर्षण वाढले आहे. लोकांना भारतात यायचे असून त्यांना हा देश समजून घ्यायचा आहे. तमिळ भाषा व संस्कृती जगाच्या अनेक कोपऱ्यात पोहचावी यासाठी माझे सरकार प्रयत्नशील आहे. २१ व्या शतकात या महान परंपरेला मला पुढे न्यायचे आहे. रामेश्वरम व तमिळनाडूची जमीन आम्हाला नवीन प्रेरणा देत राहील, असे त्यांनी नमूद केले.
रामनाथ स्वामी मंदिरात केली पूजा
पंतप्रधान मोदी यांनी रामनवमीनिमित्त तमिळनाडूच्या रामेश्वरम येथील रामनाथ स्वामी मंदिरात पूजा केली. श्रीलंकेतून येताना मोदी यांनी विमानातून रामसेतूचे निरीक्षण केले व त्याची माहिती घेतली.
४ हजार मच्छिमार श्रीलंकेतून परत आले
भारत सरकार मच्छिमारांसोबत उभे आहे. केंद्राच्या प्रयत्नाने ४ हजारांहून अधिक मच्छिमार श्रीलंकेतून परत आले आहेत. काही जणांना फाशीची शिक्षा झाली होती. त्यांना श्रीलंकेतून जिवंत परत आणून कुटुंबीयांकडे सोपवले आहे, असे ते म्हणाले.