...तर पुढचा महाकुंभ वाळवंटात भरवावा लागेल; पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचा इशारा, पंतप्रधानांना लिहिले पत्र

हिमालयातील हिमनद्या वेगाने वितळत आहेत. या हिमनद्यांचे संरक्षण न केल्यास १४४ वर्षांनंतर पुढील महाकुंभ सुकलेल्या नदीत करावा लागेल.
...तर पुढचा महाकुंभ वाळवंटात भरवावा लागेल; पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचा इशारा, पंतप्रधानांना लिहिले पत्र
Published on

नवी दिल्ली : हिमालयातील हिमनद्या वेगाने वितळत आहेत. या हिमनद्यांचे संरक्षण न केल्यास १४४ वर्षांनंतर पुढील महाकुंभ सुकलेल्या नदीत करावा लागेल, असा इशारा पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी दिला. वांगचुक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याबाबत खुले पत्र लिहिले आहे.

ते म्हणाले की, हिमालयातील हिमनदीचा तुकडा आम्ही हार्वर्ड केनेडी स्कूल, एमआयटी, बोस्टन व न्यूयॉर्कच्या संयुक्त राष्ट्र मुख्यालयात पोहचवला. त्यानंतर २१ फेब्रुवारी रोजी न्यूयॉर्कच्या हडसन नदी व पूर्व नद्यांच्या संगमावर त्याचे विसर्जन केले. जगाचे लक्ष वातावरण बदलाकडे जाण्यासाठी हा उपक्रम राबवला.

संयुक्त राष्ट्रांनी २०२५ हे वर्ष हिमनदी संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय वर्ष घोषित केले. आपल्या पत्रात वांगचुक म्हणाले की, हिमालयात आर्क्टिक आणि अंटार्टिकानंतर पृथ्वीवरील तिसऱ्या क्रमांकाचा बर्फ आहे. त्यामुळे हिमालयाला तिसरे ध्रुवही म्हणतात. त्यामुळे भारताला या मुद्द्यावर जागतिक नेतृत्व केले पाहिजे. हिमालयावर भारताचे जीवन अवलंबून आहे. कारण हिमालयातून गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा आणि सिंधु नदी जन्म घेते. सध्या वातावरण बदल व वृक्षतोडीकडे दुर्लक्ष केल्यास येत्या दशकात या पवित्र नद्या मोसमी नद्या बनू शकतील. भविष्यात महाकुंभ हा कोणत्याही पवित्र नदीच्या किनाऱ्यावर नव्हे तर वाळवंटात साजरा करावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

सर्वसामान्य माणसांमध्ये या पर्यावरण संकटाची जाणीव नाही. भारताने हिमालयीन हिमनद्यांच्या संरक्षणासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे, असे आवाहन त्यांनी केले.

logo
marathi.freepressjournal.in