"उद्धव ठाकरे जेलमध्ये असतील..." अरविंद केजरीवाल नेमकं काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सर्व प्रमुख नेत्यांना संपवू पाहत आहेत अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी केली.
उद्धव ठाकरे अरविंद केजरीवाल
उद्धव ठाकरे अरविंद केजरीवाल प्रातिनिधिक फोटो

दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सर्व प्रमुख नेत्यांना संपवू पाहत आहेत, अशी टीका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली. कथित मद्यधोरण घोटाळ्यातील मनी लाँडिंग प्रकरणात केजरीवाल यांना काल न्यायालयानं अंतरिम जामीन मंजूर केला. त्यानंतर दिल्लीतील आपच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेत त्यांनी पंतप्रधान मोदींवर टीकेची झोड उठवली. विरोधी पक्षातील नेत्यांना मोदी तुरुंगात टाकत आहेत आणि भाजप नेत्यांचं राजकारण संपवत आहेत, असं केजरीवाल म्हणाले. ते पुन्हा निवडून आल्यास ममता बॅनर्जी, तेजस्वी यादव, उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधी पक्षातील नेत्यांना जेलमध्ये टाकतील, असं ते म्हणाले. एवढंच नाही तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं राजकारणही ते संपवतील, असा दावाही अरविंद केजरीवाल यांनी केला.

मोदींचं 'वन नेशन वन लीडर' मिशन देशासाठी धोकादायक...

अरविंद केजरीवाल म्हणाले की, "पंतप्रधानांनी एक खूप धोकादायक मिशन सुरु केलंय. त्याचं नाव आहे 'वन नेशन वन लीडर'. देशातील सर्व मोठ्या नेत्यांना मोदी संपवू पाहतायत. त्यासाठी दोन स्तरांवर काम सुरु आहे. जेवढे विरोधी पक्षातील नेते आहेत त्यांना तुरुंगात टाकतायत आणि भाजपातील नेत्यांचं राजकारण संपवून टाकतायत. विरोधी पक्षातील नेते सत्येंद्र जैन, मनोज सिसोदिया, अरविंद केजरीवाल, संजय सिंह, हेमंत सोरेन, ममतांच्या मंत्रीमंडळातील मंत्री, स्टॅलीन यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री या सर्वांना तुरुंगात टाकलं. आता केरळच्या मुख्यमंत्र्यांच्या मागे लागलेत."

ते उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकतील....

केजरीवाल पुढं म्हणाले की, "जर हे निवडणूक जिंकले तर माझ्याकडून लिहून घ्या, थोड्याच दिवसांत ममतादीदी, तेजस्वी यादव, स्टॅलीन, विजयन जेलमध्ये असतील, उद्धव ठाकरे देखील जेलमध्ये असतील, जितके विरोधी पक्ष नेते आहेत, त्या सर्वांना तुरुंगात टाकतील.

योगी आदित्यनाथ यांचं राजकारण संपवतील-

यांनी भाजपाचा एक नेता सोडला नाही. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुमित्रा महाजन, शिवराजसिंग चौहान, वसुंधराराजे, खट्टर साहेब , डॉ. रमनसिंग या सर्वांचं राजकारण संपवलं. आता पुढचा नंबर योगी आदित्यनाथ यांचा

जर ही निवडणूक जिंकले तर दोन महिन्यांत उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री बदलतील. हे लोक योगी आदित्यनाथ यांचं राजकारण संपवतील. हीच एकाधिकारशाही आहे. एकच हुकुमशहा देशात राज्य करेल.

मला १४० कोटी लोकांची साथ हवीये..

अरविंद केजरीवाल यांनी मोदींवर टीका करत म्हटलं आहे की, "आज एक हुकुमशहा देशातील लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करतोय. त्याविरोधात मी तन मन धनानं लढतोय. मला १४० कोटी लोकांची साथ हवीये. माझ्या एकट्यानं होणार नाही. मी मागण्यासाठी १४० कोटी लोकांकडे आलोय. माझ्या देशाला वाचवा. माझ्या भारताला वाचवा. हुकुमशाहीपासून देशाला वाचवा..यापूर्वी अनेकदा असे प्रसंग आले ज्यावेळी हुकुमशहांनी देशावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला, पण जनतेनं त्यांना उखडून फेकून दिलं. "

logo
marathi.freepressjournal.in