शाळा आहे, शिक्षकही आहेत, पण मुलंच नाहीत!

कर्नाटकातील दोन जिल्ह्यांत पहिलीत ‘शून्य’ प्रवेश
शाळा आहे, शिक्षकही आहेत, पण मुलंच नाहीत!

बंगळुरू : देशातील सरकारी शाळेतील परिस्थिती अत्यंत भयानक बनली आहे. कर्नाटकातील दक्षिण कन्नड व उडिपी जिल्ह्यातील पहिलीसाठी ‘शून्य’ प्रवेश झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. शाळा, शिक्षक आहेत, पण विद्यार्थीच नाहीत, अशी दुरवस्था निर्माण झाली आहे. आपल्या मुलाला इंग्रजी शाळेत घालण्याच्या हट्टापायी हा प्रकार घडला आहे.
यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू झाले. जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पहिलीच्या वर्गात एकही विद्यार्थी सरकारी शाळांना विद्यार्थी मिळालेला नाही. हीच परिस्थिती कायम राहिल्यास शाळा बंद कराव्या लागतील, असे सूत्रांनी सांगितले.

दक्षिण कन्नड व उडिपी जिल्ह्यातील ५५ शाळांमध्ये एकाही विद्यार्थ्याने प्रवेश घेतला नाही. पुत्तर तालुक्यातील दोन, बंटवाल तालुक्यातील ४, बेलथांगडी तालुक्यातील ३, मेंगळुरू उत्तर तालुक्यातील दोन, मेंगळुरू दक्षिण जिल्ह्यातील दोन, मुडबिद्रीतील तीन व सुल्लीया तालुक्यात ८ शाळामध्ये एकही विद्यार्थी पहिलीसाठी मिळालेला नाही.

इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे फॅड वाढल्याने सरकारी प्राथमिक शाळांमध्ये ‘शून्य’ ॲॅडमिशन झाली आहेत. अनेक सरकारी शाळांनी त्यांचा दर्जा चांगला राखला आहे. तरीही पालकांना आपल्याला मुलांना कन्नड माध्यमाऐवजी इंग्रजी माध्यमातून शिकवायचे आहे.
दक्षिण कन्नड जिल्ह्याचे उपसंचालक आर. दयानंद म्हणाले की, मुलांना प्रवेशासाठी वेळ गेलेली नाही. मुले पहिलीत प्रवेश घेऊ शकतात.

उडिपीचे उपसंचालक बी. गणपती म्हणाले की, सरकारी शाळांमधील वातावरण हे दर्जेदार शिक्षणासाठी पूरक असून, पालकांनी याची जाणीव करून दिली पाहिजे. प्रत्येकाने आपल्या मुलांना त्यांच्या गावच्या शाळेत पाठवले पाहिजे. त्यातूनच या शाळा टिकून राहतील.
तज्ज्ञांनी सांगितले की, या भागात इंग्रजी माध्यमाच्या शाळा झाल्याने पालकांना आपल्या मुलांना सरकारी शाळेत पाठवायचे नाही. मुलांना सरकारी शाळेत पाठवण्यासाठी बससेवाही सुरू केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in