भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्याची गरज नाही!, सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य

हिंदू हा केवळ धार्मिक शब्द नाही तर ही हजारो वर्षांची संस्कृती आहे, भारत व हिंदू हे समानार्थी शब्द आहेत, भारताला हिंदू राष्ट्र होण्यासाठी कुठल्याही अधिकृत घोषणेची गरज नाही.
मोहन भागवत
मोहन भागवत
Published on

गुवाहाटी : हिंदू हा केवळ धार्मिक शब्द नाही तर ही हजारो वर्षांची संस्कृती आहे, भारत व हिंदू हे समानार्थी शब्द आहेत, भारताला हिंदू राष्ट्र होण्यासाठी कुठल्याही अधिकृत घोषणेची गरज नाही. येथील सभ्यता व संस्कृती पाहता ते स्पष्टच आहे, असे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी येथे केले.

सरसंघचालक भागवत हे सध्या आसामच्या दौऱ्यावर आहेत. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त ते देशभर दौरे करीत आहेत. दरम्यान, त्यांनी मंगळवारी गुवाहाटी येथे बुद्धिजीवी, विद्वान, संपादक, लेखक व उद्योजकांसह प्रतिष्ठित लोकांच्या समूहाला संबोधित केले. या संवादात्मक सत्रात त्यांनी संघाच्या संस्कृतीविषयक दृष्टिकोनावर, राष्ट्रीय आव्हानांवर, ईशान्येकडे संघाच्या चालू असलेल्या कार्यक्रमांवर चर्चा केली. ज्याला भारताचा अभिमान आहे, ज्याचे भारतावर प्रेम आहे तो हिंदू आहे. मग त्याची वैयक्तिक उपासनेची, प्रार्थनेची पद्धत कुठलीही असो, तो हिंदूच आहेत, असे ते म्हणाले.

संघटना कशासाठी?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मूळ तत्त्वज्ञान स्पष्ट करताना सरसंघचालक म्हणाले, ही संघटना कोणाचाही विरोध करण्यासाठी, कोणाचेही नुकसान करण्यासाठी, कोणालाही कुठलीही इजा पोहोचवण्यासाठी नव्हे तर एक प्रगत समाज व व्यक्ती निर्माण करण्यासाठी सुरू झाली आहे. वैयक्तिक चारित्र्य निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी व भारताला विश्वगुरू बनवण्यात योगदान देण्यासाठी ही संघटना उभी राहिली आहे. कोणलाही संघाबद्दल समजून घ्यायचे असेल तर कुठल्याही कपोलकल्पित अथवा पसरवलेल्या कथांवर अवलंबून न राहता संघाच्या शाखांमध्ये उपस्थित राहून संघ समजून घ्यावा. कारण विविधतेमध्ये भारताला एकत्र आणण्याच्या व्यवस्थेला ‘आरएसएस’ म्हणतात, असेही सरसंघचालकांनी स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in