पाककडून अणुहल्ल्याचे कोणतेही संकेत नव्हते! परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांची माहिती

भारत आणि पाकिस्तानमध्ये नुकताच झालेला संघर्ष हा पारंपरिक पद्धतीपर्यंत मर्यादित होता. पाकिस्तानने अणुहल्ल्याचे संकेत दिले नव्हते, अशी माहिती भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी दिली.
विक्रम मिस्त्री
विक्रम मिस्त्री
Published on

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमध्ये नुकताच झालेला संघर्ष हा पारंपरिक पद्धतीपर्यंत मर्यादित होता. पाकिस्तानने अणुहल्ल्याचे संकेत दिले नव्हते, अशी माहिती भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी दिली.

‘ऑपरेशन सिंदूर’बाबत संसदेच्या परराष्ट्र विभागाच्या स्थायी समितीला मिसरी यांनी भारत-पाक संघर्षाबाबत माहिती दिली.

सूत्रांनी सांगितले की, युद्धविरामाचा निर्णय हा दोन्ही देशांनी घेतला होता. संघर्ष रोखण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेले दावे त्यांनी फेटाळून लावले.

भारत आणि पाकिस्तानमध्ये तडजोड झाली नसती तर हा संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, असा दावा ट्रम्प यांनी केला होता. त्यावर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी काही प्रश्न उपस्थित केले. भारताने यापूर्वीही स्पष्ट केले की, युद्धविरामाचा निर्णय दोन्ही देशांतील चर्चेनंतर घेण्यात आला. दोन्ही देशांमध्ये ‘डीजीएमओ’ स्तरावर चर्चा झाली. त्यानंतर १० मे रोजी युद्धविराम करण्यात आला. काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परराष्ट्र खात्याच्या स्थायी समितीच्या बैठकीत तृणमूलचे अभिषेक बनर्जी, काँग्रेसचे राजीव शुक्ला व दीपेंद्र हुड्डा, एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी आणि भाजपचे अपराजिता सारंगी व अरुण गोविल यांच्यासहित अनेक खासदारांनी सहभाग घेतला. भारताच्या सैन्य दलाने भारताच्या सैन्य तळ व नागरी वस्त्यांवर हल्ला करण्याचे प्रयत्न उधळून लावले, असे त्यांनी सांगितले.

ट्रम्प यांनी आम्हाला विचारले नाही!

ट्रम्प यांच्या मध्यस्थीने भारत-पाकिस्तानात युद्धविराम झाला का? यावर मिसरी म्हणाले की, हे खरे नाही. हा भारत आणि पाकिस्तानातील मुद्दा आहे. कोणत्याही देशाला जम्मू-काश्मीरबाबत टिप्पणी करण्याचा अधिकार नाही. ट्रम्प आम्हाला विचारून या प्रश्नात पडले नाहीत. ते अचानक आले तर आम्ही काय करू शकत होतो, असे उत्तर त्यांनी दिले.

logo
marathi.freepressjournal.in