नवी दिल्ली : नेहमी वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्या खासदार कंगना राणावत यांनी देशात झालेल्या शेतकरी आंदोलनाबाबत वादग्रस्त विधान केले. शेतकरी आंदोलनात बलात्कार आणि हत्या झाल्याचा आरोप तिने केला आहे.
‘एका दैनिका’ला दिलेल्या मुलाखतीत कंगना म्हणाल्या की, 'आपल्या देशाचे सर्वोच्च नेतृत्व मजबूत नसते, तर या लोकांनी पंजाबला बांगलादेश बनवले असते. शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली जे काही चालू होते, ते संपूर्ण देश पाहत होता. निषेधाच्या नावाखाली हिंसाचार कसा पसरवला गेला. आंदोलनादरम्यान अनेक माणसे मारली गेली, मृतदेहांना लटकवले गेले, बलात्कार झाले.सरकारने कृषी विधेयक मागे घेताच या साऱ्यांना धक्का बसला. कारण त्यांना खूप काही करायचे होते. पण, त्यांच्यावर सरकारने वेळीच नियंत्रण मिळवले, अन्यथा ते काहीही करू शकले असते.', असे कंगना म्हणाल्या.
बांगलादेशातील परिस्थितीवर बॉलिवूडमधील कुणीही भाष्य केले नाही. यावर कंगना म्हणते की, 'या लोकांना काहीही माहिती नसते. ते फक्त आपल्याच तंद्रीत असतात. सकाळी मेकअप करुन बसतात. देशात किंवा जगात काय चालले आहे, याने त्यांना काही फरक पडत नाही. आपले काम असेच चालू राहावे, देश नरकात गेला तरी चालेल. मात्र, देशाचे काही नुकसान झाले, तर त्यांचेही मोठे नुकसान होईल, हे ते विसरतात,' असे कंगना म्हणाल्या.