‘त्यांना’ घटनेवर प्रेम असल्याचा आव आणण्याचा अधिकार नाही - पंतप्रधान

ज्यांनी देशावर आणीबाणी लादली त्यांना राज्यघटनेवर प्रेम असल्याचा आ‌व आणण्याचा अधिकार नाही, असा हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी चढविला.
नरेंद्र मोदी
नरेंद्र मोदीFPJ
Published on

नवी दिल्ली : ज्यांनी देशावर आणीबाणी लादली त्यांना राज्यघटनेवर प्रेम असल्याचा आ‌व आणण्याचा अधिकार नाही, असा हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी चढविला. आणीबाणीच्या प्रश्नावर भाजपच्या उच्चपदस्थ नेत्यांनी मंगळवारी काँग्रेस पक्षावर जोरदार हल्ला चढविला.

देशात आणीबाणी लादण्यात आल्याच्या घटनेला ४९ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपने काँग्रेसवर जोरदार हल्ला चढविला. त्याला देशात गेल्या १० वर्षांपासून अघोषित आणीबाणी लागू असल्याचे प्रत्युत्तर काँग्रेसने दिले. काँग्रेसने मूलभूत स्वातंत्र्य आणि घटना पायदळी तुडविल्याचे मोदी म्हणाले. एकच कुटुंब सत्तेवर राहावे यासाठी काँग्रेसने अनेकदा घटना पायदळी तुडविली, लोकशाहीची हत्या करण्यात आल्याचे हे एक सर्वात मोठे उदाहरण आहे, त्यानंतर त्याची अनेकदा पुनरावृत्ती झाली, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी काँग्रेसने माफी मागावी, अशी मागणी केली. कोणत्याही स्थितीत सत्ता काबीज करण्यासाठी तत्कालीन काँग्रेस सरकारने लोकशाहीची तत्त्वे पायदळी तुडविली आणि देशाला कारागृहाचे रूप आणले. ज्यांनी आणीबाणी लादली त्यांना राज्यघटनेवर प्रेम असल्याचा आव आणण्याचा अधिकार नाही, असे मोदी यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे.

गेल्या १० वर्षात अघोषित आणीबाणी - खर्गे

नरेंद्र मोदी आपले अपयश झाकून टाकण्यासाठी भूतकाळातील घटनांचा संदर्भ देत आहेत. देश भविष्याकडे लक्ष ठेवून असताना तुम्ही अपयश झाकण्यासाठी जुन्या घटनांना उजाळा देत आहात, गेल्या १० वर्षात तुम्ही १४० कोटी देशवासीयांना अघोषित आणीबाणीची जाणीव करून दिली आहे, असे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in