पावसाळी अधिवेशनात विरोधकांचा गदारोळ ; कामकाज दिवसभरासाठी तहकूब

हे अधिवेशन फलदायी करावे आणि सकारात्मक धोरणे व निर्णयांवर चर्चा करण्यात यावी
पावसाळी अधिवेशनात विरोधकांचा गदारोळ ; कामकाज दिवसभरासाठी तहकूब

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा सोमवारी वादळी प्रारंभ झाला. दोन्ही सभागृहात विरोधकांनी महागाई व अग्निपथ योजनेवरून गदारोळ केल्याने कोणतेही कामकाज न होता दोन्ही सभागृहे दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली.

हे अधिवेशन फलदायी करावे आणि सकारात्मक धोरणे व निर्णयांवर चर्चा करण्यात यावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधकांना केले; मात्र तरीही संसदेत पहिल्याच दिवशी जोरदार गदारोळ झाला. दिल्लीत पावसाला सुरुवात झाली असली तरी तापमान घसरलेले नाही; मात्र संसदेतील तापमान घसरतेय का ते पाहावे लागेल, अशी मिश्कील टिप्पणीही पंतप्रधानांनी यावेळी केली.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारी सुरुवात झाली. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर राष्ट्रपती निवडणुकीत मतदान करण्यासाठी दुपारी २ वाजेपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आले. त्यानंतर सभागृह सुरू झाल्यानंतर अग्निपथ योजना व महागाईच्या मुद्द्यावरून तीव्र गदारोळ झाल्यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज मंगळवारपर्यंत तहकूब करण्यात आले.

तत्पूर्वी, राज्यसभा व लोकसभेच्या नव्या सदस्यांना शपथ देण्यात आली. दुसरीकडे, राज्यसभेच्या कामकाजाला सुरुवात होताच विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सभागृहात तीव्र गदारोळ केला. यामुळे राज्यसभेचे कामकाजही दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

राज्यसभेत महागाई व जीएसटी दरात वाढ झाल्याच्या निषेधार्थ काँग्रेस खासदारांनी सभागृहातील मोकळ्या जागेत जमा होऊन घोषणाबाजी करीत गदारोळ केला. त्यानंतर सभागृहाचे कामकाज उद्यापर्यंत स्थगित करण्यात आले. राष्ट्रपती निवडणुकीच्या मतदानानंतर लोकसभा सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर डाव्या पक्षांनी आणि काँग्रेसने महागाई व अन्य मुद्द्यांवरून फलक फडकवित घोषणाबाजी सुरू केली. या गोंधळात कायदेमंत्री किरण रिजिजू यांनी कुटुंब न्यायालय (सुधारणा) विधेयक मांडले; मात्र विरोधकांचा गदारोळ सुरूच राहिल्याने अखेर लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in