हा निवडणूक प्रक्रियेच्या बदनामीचा कट; निवडणूक आयोगाने ‘एडीआर’चे निष्कर्ष फेटाळले

उमेदवाराखेरीज अन्य व्यक्तींकडून निवडणूक प्रक्रिया बदनामीचा कट सुरू असल्याचा आरोप करून निवडणूक आयोगाने ‘एडीआर’चे आरोप फेटाळून लावले आहेत.
हा निवडणूक प्रक्रियेच्या बदनामीचा कट; निवडणूक आयोगाने ‘एडीआर’चे निष्कर्ष फेटाळले
Published on

नवी दिल्ली : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत प्रत्यक्ष मतदानापेक्षा अधिक मते किंवा कमी मते पडल्याचा आरोप ‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’ (एडीआर) या संस्थेने एका अहवालातून केला होता. उमेदवाराखेरीज अन्य व्यक्तींकडून निवडणूक प्रक्रिया बदनामीचा कट सुरू असल्याचा आरोप करून निवडणूक आयोगाने ‘एडीआर’चे आरोप फेटाळून लावले आहेत.

जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशातील निवडणूक प्रक्रिया राबवताना प्रत्येक टप्प्यावर उमेदवार व सहभागी पक्षांकडून सर्वात जास्त पारदर्शकता बाळगण्यात आली होती. मात्र, काही जणांकडून या निवडणुकीच्या बदनामीचा डाव सुरू आहे. निवडणूक प्रक्रियेत सर्व कायदेशीर बाबींचे पालन करण्यात आले आहे.

‘एडीआर’च्या अहवालावर काँग्रेसने प्रतिक्रिया दिल्यानंतर निवडणूक आयोगाने हे स्पष्टीकरण दिले. ‘एडीआर’ने लोकसभा मतदानात मतांची टक्केवारी वाढल्याबद्दल शंका उपस्थित केली होती व निवडणूक आयोगाने याबाबत शंकानिरसन करण्याची मागणी केली होती.

निवडणूक आयोगाने सांगितले की, निवडणूक आयोगाची बदनामी करण्याची खोटी मोहीम चालवली जात आहे. आतापर्यंत सर्वात जास्त पारदर्शी पद्धतीने राबवलेली निवडणूक प्रक्रिया बदनाम करण्यासाठी ही मोहीम चालवली जात आहे. मतदानाच्या दिवशी सायंकाळी ५ वाजता अंदाजित मतदानाच्या टक्केवारीच्या तुलनेत मतदानाच्या दुसऱ्या दिवशी उपलब्ध केलेल्या टक्केवारीमुळे मतदानात तफावत आढळून आल्याचा आरोप करण्यात आला होता. निवडणुकीचा डेटा व निकाल जाहीर करताना निवडणुकीच्या कायदेशीर प्रक्रियांचे पालन करण्यात आले, असे आयोगाने सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in