"ही लोकशाहीची थट्टा आणि हत्या", चंदीगड महापौरपदाच्या निवडणूकीवर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे

"अशा पद्धतीने निवडणुका घेतल्या जातात का? ही लोकशाहीची थट्टा आहे. ही लोकशाहीची हत्या आहे. आम्ही भयभीत झालो आहोत. या माणसावर कारवाई झाली पाहिजे. हे पीठासीन अधिकाऱ्याचे वर्तन..."
"ही लोकशाहीची थट्टा आणि हत्या", चंदीगड महापौरपदाच्या निवडणूकीवर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे

नुकतीच पार पडलेली चंदीगड महापौरपदाची निवडणूक देशभरात चर्चेची ठरली. या निवडणुकीत मोठा गैरप्रकार झाल्याचे समोर आले असून सुप्रीम कोर्टाने ही निवडणूक घेणाऱ्या पीठासीन अधिकाऱ्याला चांगलेच झापले आहे. ही लोकशाहीची 'थट्टा' आणि 'हत्या' असून या अधिकाऱ्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, असे कोर्टाने म्हटले आहे. तसेच, पीठासीन अधिकाऱ्याने मतपत्रिकेत छेडछाड केल्याचेही न्यायालयाने तोंडी सांगितले.

चंदीगड महापौर निवडणुकीत आप-काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर आम आदमी पक्षाने पंजाब हरियाणा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.मात्र, उच्च न्यायालयाने याबाबतची सुनावणी लांबवली त्यानंतर महापौरपदाचे पराभूत उमेदवार कुलदीप कुमार यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.

काय म्हणाले सुप्रीम कोर्ट?

"अशा पद्धतीने निवडणुका घेतल्या जातात का? ही लोकशाहीची थट्टा आहे. ही लोकशाहीची हत्या आहे. आम्ही भयभीत झालो आहोत. या माणसावर कारवाई झाली पाहिजे. हे पीठासीन अधिकाऱ्याचे वर्तन आहे का?", असे न्यायालयाने म्हटले.

तसेच, सुप्रीम कोर्टाने पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरलमार्फत बॅलेट पेपर, व्हिडिओग्राफी आणि इतर सामग्रीसह निवडणूक प्रक्रियेचे संपूर्ण रेकॉर्ड जतन करण्याचे, तसेच, चंदीगडचे उपायुक्त, ज्यांच्याकडे सध्या रेकॉर्ड आहे, त्यांनी ते आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंत उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरलकडे हस्तांतरित करण्याचे. आदेश दिले आहेत. याचबरोबर चंदीगड महानगरपालिकेची ७ फेब्रुवारी रोजी होणारी बैठक कोर्टाच्या पुढील सुनावणीपर्यंतपुढे ढकलण्यात यावी, असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

काय आहे प्रकरण?

30 जानेवारी पार पडलेल्या चंदीगड महापौरपदाच्या निवडणुकीत आम आदमी पक्ष आणि काँग्रेसच्या उमदेवाराचा पराभव झाला होता. या निवडणुकीत आप आणि काँग्रेसकडे मिळून 20 मते होती. तर भाजप आणि अकाली दलाकडे मिळून 16 मते होती. पण, मतदानानंतर आप-काँग्रेसची आठ मते अवैध ठरवण्यात आली होती. याचा फायदा भाजप उमेदवार मनोज सोनकर यांना झाला आणि ते 16 मते मिळवत विजयी ठरले.

याविरोधात आम आदमी पार्टीने भाजपवर निवडणुकीत फेरफार केल्याचा गंभीर आरोप केला होता. भाजपने निवडणुकीत फेरफार करुन आमचे उमेदवार कारण नसताना अवैध ठरवण्यात आले, "चंदीगडच्या महापौर निवडणुकीत ज्या पद्धतीने बेईमानी केली गेली, ते अत्यंत चिंताजनक आहे. हे लोक महापौरपदाच्या निवडणुकीत एवढी खालची पातळी गाठू शकतात, तर देशातील निवडणुकीत ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. हे अत्यंत चिंताजनक आहे", असे केजरीवाल यांनी म्हटले होते. तसेच, चंदीगड महापौर निवडणुकीत हेराफेरीचा आरोप करत आम आदमी पक्षाने न्यायालयात जाण्याचेही जाहीर केले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in