"मोदीजी तुम्ही आमच्या लोकशाहीची थट्टा केली आहे"; सरकारच्या आदेशावर X ने 'असहमती' दर्शवताच काँग्रेसचा हल्लाबोल

रमेश यांनी म्हटले आहे की सरकारच्या या संबंधित खाती अवरोधित करण्याच्या आदेशांना आव्हान देणारी रिट अपील प्रलंबित आहे
"मोदीजी तुम्ही आमच्या लोकशाहीची थट्टा केली आहे"; सरकारच्या आदेशावर X ने 'असहमती' दर्शवताच काँग्रेसचा हल्लाबोल

नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या आंदोलनाशी संबंधित मायक्रोब्लॉगिंग खाती आणि पोस्ट ब्लॉक करण्याच्या भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्राच्या आदेशाशी गुरूवारी मायक्रोब्लॉगिंग साइट ‘एक्स’ने असहमती व्यक्त केली होती. मात्र तरीही त्यांना ती खाती आणि पोस्ट ब्लॉक कराव्या लागल्या. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आता भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे.

"भारत सरकारने X ला काही खाती आणि पोस्ट्सवर कारवाई करण्यास सांगणारे कार्यकारी आदेश जारी केले आहेत, तसे न केल्यास दंड आणि तुरूंगवासाचीही शक्यता आहे. आदेशांचे पालन करून, आम्ही ही खाती आणि पोस्ट फक्त भारतातच ब्लॉक करत आहोत; तथापि, आम्ही या कृतीशी असहमत आहोत", अशी पोस्ट करत 'एक्स'च्या 'ग्लोबल गन्हर्नमेंट अफेअर्स' टीमने याबाबत माहिती दिली होती. त्याच पोस्टला टॅग करत काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी 'लोकशाहीची ही भारतात केलेली हत्या' असल्याची टीका केली आहे. तर, 'भारतासाठी जागतिक गौरव, मोदीजी तुम्ही आमच्या लोकशाहीची थट्टा केली आहे' असे काँग्रेसच्या सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या अध्यक्षा सुप्रिया श्रीनेत यांनी म्हटले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने गृह मंत्रालयाच्या विनंतीवरून सोशल मीडिया मंचावर शेतकऱ्यांच्या आंदोलनाशी संबंधित १७७ खाती तात्पुरती ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत. माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयातील अधिकारी ‘एक्स’च्या निवेदनाचा अभ्यास करत असून लवकरच त्याला उत्तर दिले जाणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in