
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी (दि. १५) रात्री १० च्या दरम्यान चेंगराचेंगरी झाली. महाकुंभमेळ्यासाठी मोठ्या संख्येने भाविक प्रयागराजकडे जात असताना ही घटना घडली. घटनेमध्ये किमान १८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. दरम्यान, उत्तर रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी (सीपीआरओ) हिमांशू उपाध्याय यांनी रविवारी या घटनेमागच्या कारणाविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे. 'फ्री प्रेस जर्नल'ने याचे वृत्त दिले आहे.
उत्तर रेल्वेचे सीपीआरओ हिमांशू उपाध्याय यांनी याविषयी निवेदन दिले. ते म्हणाले, ''काल ही दुःखद घटना घडली तेव्हा पाटण्याकडे जाणारी मगध एक्सप्रेस नवी दिल्ली रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १४ वर उभी होती आणि जम्मूकडे जाणारी उत्तर संपर्क क्रांती ही प्लॅटफॉर्म क्रमांक १५ वर उभी होती. यावेळी प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात गर्दी होती. या दरम्यान, प्लॅटफॉर्म क्रमांक १४-१५ कडे जाणाऱ्या एका प्रवाशाचा पायऱ्यांवरून पाय घसरला आणि तो पडला. त्यामुळे त्याच्या मागे उभे असलेले अनेक प्रवासी धडकले आणि ही दुःखद घटना घडली, अशी प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, घटनेविषयी अधिक तपास करण्यासाठी उच्चस्तरीय समितीकडून चौकशी केली जात आहे. या घटनेचा कोणत्याही रेल्वे सेवेवर परिणाम झाला नाही. कोणतीही ट्रेन रद्द करण्यात आली नाही किंवा प्लॅटफॉर्ममध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. चेंगराचेंगरीच्या घटनेची चौकशी सुरू आहे. समितीला त्यांचा अहवाल आणि निष्कर्ष सादर करू द्या. प्लॅटफॉर्मवरील परिस्थिती आता सामान्य आहे. सर्व गाड्या त्यांच्या नेहमीच्या वेळेनुसार धावत आहेत.''
रेल्वे उपायुक्त केपीएस मल्होत्रा यांनी प्लॅटफॉर्मवर एवढी मोठी गर्दी का जमली होती याविषयी माहिती देताना सांगितले, ''प्रयागराज एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक १४ वर उभी होती. तिथे मोठ्या संख्येने प्रवासी जमले होते. या व्यतिरिक्त स्वतंत्र सेनानी एक्सप्रेस आणि भुवनेश्वर राजधानीच्या गाड्यांना सुटण्यास विलंब झाल्यामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक १२, १३ आणि १४ प्लॅटफॉर्मवर आणखी गर्दी झाली. त्यावेळी ही घटना घडली,'' असे ते म्हणाले.
तर अहवालानुसार, सुमारे १५०० लोकांना जनरल डब्याचे तिकीट विकण्यात आले होते. यामुळे प्रचंड गर्दी झाली. तसेच प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरील स्वयंचलित पायऱ्यांजवळ परिस्थिती आणखी बिकट झाली.
घटनेच्या चौकशीसाठी दोन सदस्यांची उच्चस्तरीय चौकशी समिती
रेल्वे बोर्डाचे माहिती आणि प्रसिद्धी (ईडी/आयपी) कार्यकारी संचालक दिलीप कुमार यांनी सांगितले, '' या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दोन सदस्यांची उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे आणि प्रवाशांना विशेष ट्रेनने पाठवण्यात आले आहे. रेल्वे स्थानकावरील वाहतूक आता सामान्य आहे,'' असे ते म्हणाले.