यंदाचा उन्हाळा तापदायक ठरला;पर्यावरणतज्ज्ञ सुनीता नारायणन यांचे मत

यंदा एप्रिलपासूनच भीषण उष्णतेचा तडाखा भारतीयांना बसत होता. सरासरीपेक्षा तीन ते चार अंश वाढीव तापमानाने देशवासीयांच्या अंगाची लाही लाही होत होती.
यंदाचा उन्हाळा तापदायक ठरला;पर्यावरणतज्ज्ञ सुनीता नारायणन यांचे मत
Published on

नवी दिल्ली : यंदा एप्रिलपासूनच भीषण उष्णतेचा तडाखा भारतीयांना बसत होता. सरासरीपेक्षा तीन ते चार अंश वाढीव तापमानाने देशवासीयांच्या अंगाची लाही लाही होत होती. अनेक शहरांचे तापमान ४५ ते ४९ अंशादरम्यान फिरत होते, तर २७ मे रोजी दिल्लीत तापमान ४९.९ अंश असे विक्रमी तापमान नोंदवले. ही भीषण उष्णता सोसण्याची तयारीच भारतीयांची नव्हती, असे मत पर्यावरण तज्ज्ञ सुनीता नारायणन यांनी व्यक्त केले. भारतात तापमान निर्देशांक तयार करण्याची गरज असून शहरांच्या आराखड्यात मोठे बदल करावे लागतील, असे त्यांनी सांगितले.

विज्ञान व पर्यावरण केंद्राच्या महासंचालक नारायणन म्हणाल्या की, भारतात यंदाचा कडक उन्हाळा हा अल-नीनो व वातावरण बदलाचा मोठा परिणाम आहे. जागतिक स्तरावर २०२३ हे वर्षे उष्ण होते. मात्र, गेल्या ४५ दिवसांत भारतात उष्णतेचे सर्वच विक्रम मोडीत निघाले. सर्वसाधारण तापमान देशात शहरीकरण वेगाने वाढले आहे. त्यामुळे शहरात उष्णता वाढत आहे. त्याचा मोठा फटका कामगार वर्ग व कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबीयांना बसत आहे.

उष्णतेच्या लाटेमुळे मृत्यू वाढले

यंदा एप्रिल, मेमधील उष्णतेच्या लाटेमुळे मानवी सहनशक्तीची परीक्षा घेतली. तसेच देश या नैसर्गिक आपत्तीला भिडण्यासाठी किती तयार आहे, याची चाचणीही घेतली. उत्तर प्रदेश, बिहार आणि ओदिशासहित अनेक राज्यात उष्णतेच्या लाटेने अनेक नागरिकांचे बळी गेले.

फोनमध्ये तापमान निर्देशांक हवा

आपल्या मोबाईल फोनमध्ये हवेच्या गुणवत्तेची माहिती देणाऱ्या ॲॅपसोबत तापमान निर्देशांक तयार करण्याची गरज आहे. वायू प्रदूषणाचा निर्देशांक आपल्या शरीरावर काय परिणाम होतो हे दाखवून देतो, तर तापमान निर्देशांकामुळे काय करायला हवे, याची माहिती देता येऊ शकेल, असे त्यांनी सांगितले. भारतीय हवामान खात्याने गेल्याच वर्षी प्रायोगिक तत्त्वावर ‘तापमान निर्देशांक’ तयार केला होता. भारत लवकरच ‘तापमान धोका’ प्रणाली आणणार असल्याचे जाहीर केले होते. तो तापमान, हवेतील आर्द्रता आदींची माहिती देणार होता.

logo
marathi.freepressjournal.in