यंदाचा उन्हाळा अधिक तापदायक! भारतीय हवामान खात्याचा अंदाज

भारतात यंदाच्या उन्हाळ्याची सुरुवात अधिक तापदायक ठरण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामान खात्याने शुक्रवारी जाहीर केले.
यंदाचा उन्हाळा अधिक तापदायक! भारतीय हवामान खात्याचा अंदाज
Published on

नवी दिल्ली : एल निनोची सद्य: स्थिती संपूर्ण हंगामात कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आल्याने भारतात यंदाच्या उन्हाळ्याची सुरुवात अधिक तापदायक ठरण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामान खात्याने शुक्रवारी जाहीर केले. भारतातील तेलंगणा, आंध्र प्रदेश तसेच कर्नाटक आणि महाराष्ट्र, ओदिशा राज्यांतील अनेक भागांमध्ये उन्हाळा सर्वसाधारण दिवसांपेक्षा अधिक दिवसांचा असेल, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तविला आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, मार्चमध्ये देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता (२९.९ मिमीच्या दीर्घकाळाच्या सरासरीच्या ११७ टक्क्यांहून अधिक)आहे. भारतामध्ये मार्च ते मे या कालावधीत देशातील बहुतांश भागात कमाल आणि किमान तापमान सामान्यापेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे, असेही भारतीय हवामान खात्याचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मात्र, मार्चमध्ये उत्तर आणि मध्य भारतात उष्णतेची लाट अपेक्षित नाही, असेही त्यांनी नमूद केले.

महापात्रा म्हणाले की, मध्य प्रशांत महासागरातील पाण्याची नियतकालिक तापमानवाढीची प्रचलित ‘अल निनो’ स्थिती उन्हाळ्याच्या हंगामात सुरू राहील आणि त्यानंतर तटस्थ स्थिती विकसित होण्याची शक्यता आहे. ला नीना स्थिती जी सामान्यत: भारतातील चांगल्या मान्सूनच्या पावसाशी संबंधित असते. ती स्थिती मान्सून हंगामाच्या उत्तरार्धात सुरू होण्याची शक्यता असल्याचेही हवामान खात्याने सांगितले. महाराष्ट्रासह देशातील बहुतांश ठिकाणी मार्च महिन्यातील पावसाचे प्रमाण देखील सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. अल निनोचा प्रभाव जून २०२४ पर्यंत कमी होणार आहे. पूर्ण उन्हाळ्यात अल निनोचा प्रभाव असल्यामुळे यावेळी उन्हाळा अतिशय कठीण जाईल, असे सांगण्यात येत आहे.

logo
marathi.freepressjournal.in