
बंगळुरू : कर्नाटक उच्च न्यायालयाच्या सहा न्यायाधीशांना ठार मारण्याची धमकी मिळाल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाचे जनसंपर्क अधिकारी के. मुरलीधर यांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर वेगवेगळ्या दूरध्वनी क्रमांकांवरून संदेश आले. संदेश पाठवणाऱ्या अज्ञात व्यक्तीने कर्नाटक उच्च न्यायालयाच्या सहा न्यायाधीशांना ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यात मोहम्मद नवाझ, एच. टी. नरेंद्र प्रसाद, अशोक जी. निजगन्नावार, एच. पी. संदेश, के. नटराजन आणि बी. वीरप्पा या न्यायाधीशांचा समावेश होता. संदेश पाठवणाऱ्याने आपण दुबई गँगचे सदस्य आहोत असे म्हणत ५० लाख रुपयांची खंडणी मागितली होती. खंडणीचे पैसे एबीएल अलाइड बँक लिमिटेड या पाकिस्तानमधील बँकेत भरण्यास सांगितले होते. या प्रकरणी १४ जुलै रोजी बंगळुरू पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता. मात्र, अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.