

दिल्ली : दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी एका अपघातात एअर इंडियाच्या तीन उभ्या असलेल्या (पार्क केलेल्या) विमानांचे मोठे नुकसान झाले. विमानतळावरील ‘ग्राऊंड सपोर्ट इक्विपमेंट’ (विमान हाताळणीची उपकरणे) आदळल्यामुळे ही दुर्घटना घडली असून, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. नुकसान झालेली ही तिन्ही विमाने तपासणी आणि दुरुस्तीसाठी सध्या सेवेतून बाहेर (ग्राऊंडेड) करण्यात आली आहेत.
दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल-२ वर रविवारी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे ही दुर्घटना घडली. विमानतळ चालकाने दिलेल्या माहितीनुसार, वेगवान वाऱ्यामुळे धावपट्टीवरील उपकरणे सरकली आणि ती एअर इंडियाच्या ‘नॅरोबॉडी’ (ए३२०) विमानांवर जाऊन आदळली.
निवेदनात म्हटले आहे की, रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास झालेल्या खराब हवामानामुळे दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल-२ वर उभी असलेली एअर इंडियाची तीन ‘ए ३२०’ विमाने ग्राऊंड इक्विपमेंट आणि ‘फॉरेन ऑब्जेक्ट डेब्रिज’ आदळल्याने खराब झाली.
जोरदार वाऱ्याचा फटका
वेगवान वाऱ्यामुळे शेजारच्या स्टँडवर आणि जवळच्या परिसरात ठेवलेली दोन ग्राऊंड उपकरणे आपल्या जागेवरून हलली आणि वेगवेगळ्या ठिकाणी उभी असलेल्या दोन विमानांना जाऊन धडकली, ज्यामुळे विमानांचे नुकसान झाले. याशिवाय, आणखी एका विमानाच्या उजव्या बाजूच्या सरकत्या खिडकीलाही या धडकेमुळे मोठा फटका बसला आहे.