नवी दिल्ली : बोइंगने तीन अपाचे लढाऊ हेलिकॉप्टर भारतीय लष्कराला सुपूर्द केली. या हेलिकॉप्टरमुळे भारताची संरक्षण सज्जता अधिक मजबूत झाली आहे, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. भारतीय लष्कराला सहा ‘एएच-६४ ई’ अपाचे हेलिकॉप्टर पुरवण्याचा करार बोइंगने केला होता. आता सहापैकी तीन हेलिकॉप्टर त्यांनी लष्कराला पुरवली आहेत.
हे कंत्राट ४,१६८ कोटी रुपयांचे आहे. ‘एएच-६४ ई’ अपाचे हे जगातील सर्वात आधुनिक बहुउद्देशीय हेलिकॉप्टर आहे. हे हेलिकॉप्टर अमेरिकन लष्कर वापरते. अपाचे हेलिकॉप्टरचा पहिला ताफा भारतीय लष्करात सामील झाल्याने त्यांची क्षमता वाढणार आहे. दुर्गम भागात हे हेलिकॉप्टर लष्कराला उपयुक्त ठरणार आहे.