मध्य प्रदेशच्या कुनोमध्ये ‘ज्वाला’कडून तीन पिलांना जन्म; सलग १० चित्त्यांच्या मृत्यूनंतर प्रकल्पाला नवसंजीवनीची आशा, महिनाभरात दोन मादी चित्त्यांची प्रसूती

गतवर्षी मार्च महिन्यात ज्वालाने चार पिलांना जन्म दिला होता. पण त्यातील तिघांचा उष्णतेमुळे मृत्यू झाला होता आणि चौथ्या पिलाची प्रकृती काहीशी नाजूक होती.
मध्य प्रदेशच्या कुनोमध्ये ‘ज्वाला’कडून तीन पिलांना जन्म; सलग १० चित्त्यांच्या मृत्यूनंतर प्रकल्पाला नवसंजीवनीची आशा, महिनाभरात दोन मादी चित्त्यांची प्रसूती

भोपाळ : मध्य प्रदेशच्या कुनो अभयारण्यात नामिबियातून आणलेल्या ज्वाला नावाच्या मादी चित्त्याने नुकताच तीन पिलांना जन्म दिला आहे. तिन्ही पिले आणि चित्त्याची प्रकृती चांगली असून यावेळी ज्वाला तिच्या पिलांची काळजी घेईल, अशी आशा वनखात्याच्या कर्मचाऱ्यांना आहे. एकामागोमाग एक चित्त्यांच्या मृत्यूचे ग्रहण लागलेल्या प्रकल्पाला त्यामुळे नवसंजीवनी मिळण्याची आशा आहे.

गेल्या काही महिन्यांत कुनोत अनेक चित्त्यांचा मृत्यू झाल्याने भारतातील चित्ता पुनर्वसन प्रकल्पाच्या यशाबद्दल शंका व्यक्त केली जात होती. पण गेल्या महिनाभरात कुनोमधून दोन वेळा आनंदाची बातमी आली आहे. तेथील ज्वाला नावाच्या चित्त्याने नुकताच तीन बाळांना जन्म दिला आहे. तिन्ही पिले अत्यंत गोंडस असून त्यांची आणि आईची प्रकृती सध्या चांगली आहे. सध्या थंडीचे दिवस असल्याने त्यांच्या वाढीसाठी पोषक वातावरण आहे. उन्हाळा अजून लांब आहे. त्यामुळे पिलांची आई ज्वाला त्यांची व्यवस्थित काळजी घेईल, अशी आशा वन कर्मचाऱ्यांना वाटत आहे.

गतवर्षी मार्च महिन्यात ज्वालाने चार पिलांना जन्म दिला होता. पण त्यातील तिघांचा उष्णतेमुळे मृत्यू झाला होता आणि चौथ्या पिलाची प्रकृती काहीशी नाजूक होती. मध्य भारताच्या प्रखर उन्हाळ्यात त्याच्या जिवंत राहण्याची शक्यता कमी होती. कदाचित त्यामुळे चौथ्या पिलाला स्वीकारण्यास ज्वालाने नकार दिला होता. वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी ज्वालाच्या चौथ्या पिलाची विशेष काळजी घेऊन जीवदान दिले आणि आता तो चित्ता मोठा होऊ लागला आहे. लवकरच वन कर्मचारी त्याला खुल्या जंगलात शिकार करण्याचे प्रशिक्षण देणार आहेत.

दोन आठवड्यांपूर्वी कुनोतील आशा नावाच्या मादी चित्त्यानेही तीन पिलांना जन्म दिला होता. त्यातील शौर्य नावाच्या पिलाचा १६ जानेवारीला मृत्यू झाला. शौर्यची तब्येतही थोडी नाजूक होती. या दु:खद घटनेनंतर ज्वालाने तीन पिलांना जन्म दिल्याने वन कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढला आहे. या नवीन तीन पिलांचे लिंग अद्याप जाहीर केलेले नाही. जर ते नर चित्ते असतील तर ते मोठे होऊन एकत्र कळप तयार करतील आणि एकत्र शिकार करून त्यांची जगण्याची शक्यता वाढेल, असा विश्वास वन कर्मचारी व्यक्त करत आहेत.

अनियंत्रित शिकार आणि नैसर्गिक अधिवासांचा नाश यामुळे भारतीय चित्ता काही दशकांपूर्वीच नामशेष झाला होता. चित्त्यासारखा देखणा आणि चपळ प्राणी देशातून नाहीसा होणे ही प्राणिप्रेमींसाठी विशेष हळहळीची बाब होती. ही कमी भरून काढण्यासाठी आफ्रिकेतून भारतात चित्ता आणण्याची योजना आखण्यात आली. फेब्रुवारी २०२२ आणि सप्टेंबर २०२३ अशा दोन हप्त्यांत मध्य प्रदेशच्या कुनो अभयारण्यात नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून एकूण २० चित्ते आणून सोडण्यात आले होते. मात्र, विविध कारणांमुळे आतापर्यंत त्यातील सात प्रौढ चित्ते आणि तीन पिलांचा मृत्यू झाला आहे. १६ जानेवारी रोजी त्यातील शौर्य नावाच्या पिलाचा मृत्यू झाला होता.

logo
marathi.freepressjournal.in