छत्तीसगडमध्ये सीआरपीएफचे तीन जवान शहीद; माओवाद्यांशी जोरदार चकमक, १४ जवान जखमी

छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यात मंगळवारी माओवाद्यांशी झालेल्या चकमकीत सीआरपीएफचे तीन जवान शहीद झाले आणि १४ जवान जखमी झाले.
छत्तीसगडमध्ये सीआरपीएफचे तीन जवान शहीद;  माओवाद्यांशी जोरदार चकमक, १४ जवान जखमी

रायपूर : छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यात मंगळवारी माओवाद्यांशी झालेल्या चकमकीत सीआरपीएफचे तीन जवान शहीद झाले आणि १४ जवान जखमी झाले. सुरक्षादलांचे संयुक्त पथक शोधमोहिमेवर असताना टेकलगुडेम गावाजवळ ही घटना घडली, असे पोलीस महानिरीक्षक (बस्तर रेंज) पी. सुंदरराज यांनी सांगितले.

टेकलगुडेम हे गाव बिजापूर आणि सुकमा जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. या भागात मंगळवारी कमांडो बटालियन फॉर रिझोल्युट ॲक्शन (कोब्रा) या खास नक्षलविरोधी दलाच्या २०१ व्या बटालियनचे कमांडो आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) १५० व्या बटालियनचे जवान फॉरवर्ड ऑपरेटिंग बेस (एफओबी) स्थापन करण्यासाठी काम करत होते.

तेव्हा दुपारी १ वाजण्याच्या सुमारास माओवाद्यांनी त्यांच्यावर अचानक हल्ला करून गोळीबार सुरू केला. माओवाद्यांनी इम्प्रुवाइज्ड एक्स्प्लोझिव्ह डिव्हाईसचा (आयईडी) स्फोट घडवून बॅरल-लाँच्ड ग्रेनेड्सचाही वापर केला. सुरक्षादलांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीत सीआरपीएफचे तीन जवान शहीद झाले असून १४ जवान जखमी झाले आहेत. माओवाद्यांबरोबरील चकमक संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू होती. जखमी जवानांना हेलिकॉप्टरद्वारे छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये उपचारांसाठी आणले जात आहे.

माओवादी कमांडर हिडमाचा शोध

टेकलगुडेम हे गाव माओवाद्यांच्या पीपल्स लिबरेशन गरिला आर्मी (पीएलजीए) या सशस्त्र पथकांच्या पहिल्या बटालियनचा कमांडर हिडमा उर्फ देवा याच्या प्रदेशात येते. टेकलगुडेमपासून जवळच असलेले सुकमा जिल्ह्यातील जगरगुडा भागातील पूवर्ती हे गाव हिडमाचे मूळ ठिकाण आहे. हिडमा साधारण ५३ वर्षांचा असून बुटका आहे, इतकीच माहिती सुरक्षादलांना आहे. त्याने आजवर सुरक्षादलांवर २६ हल्ले केले आहेत. याच परिसरात २०२१ साली माओवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत सुरक्षादलांचे २३ जवान शहीद आणि ३३ जवान जखमी झाले होते. सुरक्षादले हिडमाचा कसून शोध घेत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in