

नवी दिल्ली : दिल्ली सरकारच्या उपकराला आणि सीएनजीच्या वाढत्या किमतींना विरोध करण्यासाठी अनेक वाहतूक आणि टॅक्सी संघटनांनी गुरुवारी दिल्ली-एनसीआरमध्ये तीन दिवसीय संप सुरू केला. यामुळे गुरुवारी अनेक भागांत हजारो प्रवाशांना प्रवासादरम्यान मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
हा तीन दिवसीय संप २३ मे पर्यंत चालणार असून, प्रामुख्याने व्यावसायिक वाहनांवर पर्यावरण नुकसानभरपाई उपकर वाढवण्याच्या दिल्ली सरकारच्या निर्णयाविरोधात हा संप पुकारण्यात आला आहे. नवी दिल्ली रेल्वे स्टेशन आनंद विहार, मंडी हाऊस मेट्रो स्टेशन आणि इतर ठिकाणांसह राष्ट्रीय राजधानीतील काही अत्यंत गजबजलेल्या भागात प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागले. या आंदोलनाचा भाग म्हणून संजय गांधी ट्रान्सपोर्ट नगरसारख्या औद्योगिक क्षेत्रांमध्ये ट्रक रस्त्याच्या कडेला उभे असलेले पाहायला मिळाले.
एका प्रवाशाने सांगितले की, ‘आम्ही घरी जाण्यासाठी टॅक्सी बुक करण्याचा प्रयत्न केला, परंतु नेहमीपेक्षा जास्त वेळ वाट पाहावी लागत होती आणि स्टेशनवर ऑटो-रिक्षाही खूप कमी उपलब्ध होत्या. कॅब बुकिंगचे भाडेही खूप जास्त दाखवत होते.’
ट्रकचालक, खासगी बस, टॅक्सी आणि मॅक्सी कॅबचालकांची सर्वोच्च संघटना असलेल्या 'एआयएमटीसी'ने मंगळवारी या संपाची हाक दिली होती.
ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष हरीश सभरवाल यांनी सांगितले की, 'आम्ही प्रदूषण कमी करण्याच्या प्रयत्नांचे समर्थन करतो. परंतु, गेल्या १०-१२ वर्षांत पर्यावरण नुकसानभरपाई उपकराच्या माध्यमातून सुमारे १५०० कोटी रुपये गोळा करूनही, सरकारने या निधीचा वापर वाहतूक कल्याण, पार्किंग, रस्ते किंवा प्रदूषण नियंत्रण उपायांसाठी योग्य प्रकारे केलेला नाही.'
सभरवाल पुढे म्हणाले, 'युरो-५ वाहने ही प्रदूषणमुक्त प्रकार म्हणून आम्हाला विकली गेली होती, तरीही त्यांच्यावर प्रदूषण कर लादला जात आहे, जो की विरोधाभासी आहे. सरकारने संपूर्ण बोजा ट्रान्सपोर्टर्सवर टाकू नये आणि व्यावहारिक उपायांसह पुढे यावे.'
इंधनाच्या वाढत्या किमती लक्षात घेऊन टॅक्सी आणि ऑटोच्या भाड्यात वाढ करण्याची मागणी करत दिल्लीतील व्यावसायिक वाहन चालकांच्या संघटनांनीही या संपाला पाठिंबा दिला आहे.
ट्रान्सपोर्टर्स युनियनच्या निवेदनानुसार, हा संप ‘हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोग, न्यायालये आणि दिल्ली सरकारने वाहतूक क्षेत्रावर लादलेल्या अन्यायकारक धोरणांचा निषेध करतो.
‘चालक शक्ती युनियन’चे उपाध्यक्ष अनुज कुमार राठोड यांनी सांगितले की, सीएनजी, पेट्रोल आणि डिझेलच्या सातत्याने वाढणाऱ्या किमतींमुळे मध्यमवर्गीय चालकांना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. ते म्हणाले, म्हणूनच, दिल्लीतील इतर संघटनांच्या समन्वयाने 'चालक शक्ती युनियन'ने 'चक्का जाम'ची हाक दिली आहे आणि २१, २२ आणि २३ मे रोजी वाहने न चालवण्याचे आवाहन केले आहे.
एका ऑटो-रिक्षाचालकाने सांगितले की, ‘पेट्रोल आणि डिझेल’चे दर वाढले आहेत, परंतु आमच्या ऑटोचे किमान भाडे तेच आहे; ग्राहक जास्तीचे पैसे देत नाहीत आणि सरकारने नियमात बदल केलेला नाही. या महागाईत अन्न मिळवणेही कठीण होत चालले आहे.’
'चालक शक्ती युनियन'ने सोमवारी दिल्लीचे नायब राज्यपाल तरनजीत सिंग संधू आणि मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना त्यांच्या मागण्यांबाबत पत्र लिहिले आहे.
कुलदीप सिंग या टॅक्सीचालकाने सांगितले की, ‘पेट्रोल आणि सीएनजी’च्या किमती वाढल्या आहेत, पण आमचे उत्पन्न वाढत नाही. गेल्या दोन दिवसांपासून सीएनजी वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे मी पाहत आहे. काही पंप बंद आहेत. गाझीपूरमध्ये ४-५ पंपांपैकी २ पंप काल बंद होते, ज्यामुळे एक किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या होत्या.’ तथापि, सहा ऑटो रिक्षा संघटनांनी या संपापासून स्वतःला दूर ठेवले आहे.