
कोरोनाकाळापासून सुरू असलेली ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना’ सप्टेंबर महिनाअखेरीस बंद होणार होती; मात्र या योजनेला आणखीन तीन महिने मुदतवाढ देत केंद्र सरकारने देशातील गरीब जनतेला मोठा दिलासा दिला आहे.
सरकारने मोफत रेशन देणाऱ्या योजनेची मुदत अजून तीन महिने वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे जवळपास ८० कोटी लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. यापूर्वी मार्च २०२२मध्ये ही योजना बंद होणार होती; मात्र केंद्र सरकारने त्यावेळी सहा महिन्यांसाठी म्हणजेच ३० सप्टेंबरपर्यंत या योजनेला मुदतवाढ दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.तीन महिन्यांसाठी मोफत रेशनची योजना पुढे वाढवल्यामुळे सरकारच्या तिजोरीवर ४५ हजार कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. केंद्र सरकारने शिल्लक धान्याच्या साठ्याचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या सरकारकडे धान्याचा साठा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. यापूर्वी मोफत रेशनची योजना आता बंद होईल, अशी चर्चा होती.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, “केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना’ पुढील तीन महिन्यांसाठी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना मार्च २०२०मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत समाविष्ट असलेल्या सुमारे ८० कोटी लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती प्रति महिना पाच किलो अन्नधान्य मोफत देण्यासाठी सुरू करण्यात आली होती.”