
तिरुपती (आंध्र प्रदेश) : देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान असलेल्या तिरुमला तिरुपती देवस्थानम् (टीटीडी) ला नोव्हेंबर २०२४ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत विविध विश्वस्त संस्थांकडून एकूण ९१८.६ कोटी रुपयांच्या देणग्या प्राप्त झाल्या आहेत.
टीटीडीचे अध्यक्ष बी.आर. नायडू यांनी सांगितले की, त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर या विश्वस्त संस्थांना मिळणाऱ्या देणग्यांमध्ये सातत्याने वाढ होत आहे आणि देणग्या ऑनलाइन तसेच ऑफलाइन या दोन्ही माध्यमांतून मोठ्या प्रमाणात येत आहेत.
एकूण देणग्यांपैकी ५७९.३८ कोटी रुपये ऑनलाइन आणि ३३९.२० कोटी रुपये ऑफलाइन माध्यमातून प्राप्त झाले," असे नायडू यांनी सांगितले.
विविध विश्वस्त संस्थांपैकी श्री वेंकटेश्वर (एसव्ही) अन्नदान ट्रस्टला सर्वाधिक म्हणजे जवळपास ३३९ कोटी रुपये देणगी मिळाली. त्यानंतर श्रीवाणी ट्रस्टला २५२ कोटी रुपये आणि श्री बालाजी आरोग्य वरप्रसादिनी योजनेसाठी सुमारे ९८ कोटी रुपये देणगी मिळाली, अशी माहिती त्यांनी दिली.
एसव्ही प्राणदान ट्रस्टला जवळपास ६७ कोटी रुपये, एसव्ही गोसंरक्षण ट्रस्टला ५६ कोटी रुपये, एसव्ही विद्यादान ट्रस्टला ३३.४७ कोटी रुपये, बालाजी इन्स्टिट्यूट ऑफ सर्जरी, रिसर्च अँड रिहॅबिलिटेशन फॉर द डिसेबल्ड ट्रस्टला सुमारे ३० कोटी रुपये आणि एसव्ही सर्वश्रेयस ट्रस्टला २०.४६ कोटी रुपये देणगी मिळाल्याचे नायडू यांनी सांगितले.
याशिवाय, एसव्ही वेद संरक्षण ट्रस्टला १३.८७ कोटी रुपये, श्री वेंकटेश्वर भक्ती चॅनल (एसव्हीबीसी) ला ६.२९ कोटी रुपये आणि श्री वेंकटेश्वर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एसव्हीआयएमएस) ला १.५२ कोटी रुपये देणगी मिळाली, असेही त्यांनी सांगितले.
नायडू यांनी पुढे सांगितले की, अधिकाधिक दाते ऑनलाइन माध्यमाला प्राधान्य देत असून बांधकाम, यंत्रसामग्री खरेदी आणि देवस्थानाच्या तांत्रिक विकासासाठीही योगदान देत आहेत.
देणगीदारांच्या सहकार्याचा विचार करून त्यांच्याशी सन्मानपूर्वक वर्तन आणि सर्व सोयीसुविधा देण्यात कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
वेदसंवर्धनासाठी कार्य
टीटीडीने आपले विविध समाजोपयोगी उपक्रम चालविण्यासाठी अनेक विश्वस्त संस्था स्थापन केल्या आहेत, ज्यामध्ये यात्रेकरूंना मोफत अन्नदान, शिक्षण व आरोग्य क्षेत्राला सहाय्य आणि वेदसंवर्धन व प्रसार यांचा समावेश आहे. तिरुमलातील प्रसिद्ध श्री वेंकटेश्वर स्वामी मंदिर हे जगातील सर्वाधिक गर्दीच्या मंदिरांपैकी एक असून, दरवर्षी सुमारे तीन कोटी भाविक येथे दर्शनासाठी येतात.