Tirupati Laddu Controversy: तिरुपती प्रसादाच्या लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी? केंद्राने मागवला अहवाल
अमरावती : तिरुपती देवस्थानमध्ये भाविकांना देण्यात येणाऱ्या प्रसादाच्या लाडूमध्ये चरबी मिसळली जात असल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर या प्रश्नाबाबत आपण आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याशी चर्चा केली असून अहवाल मागविला असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी शुक्रवारी येथे सांगितले. केंद्र सरकार या प्रकरणाचा तपास करून योग्य ती कारवाई करील, असेही ते म्हणाले.
तिरुपती देवस्थानात भविकांना प्रसाद म्हणून दिले जाणारे लाडू तयार करण्यासाठी आंध्र प्रदेशातील पूर्वीच्या सरकारने भेसळयुक्त स्वस्त तूप खरेदी करून तिरुमला तिरुपती देवस्थानचे (टीटीडी) पावित्र्य भंग केल्याचा आरोप आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी शुक्रवारी केला. मात्र, आता आम्ही तुपाचा पुरवठादार बदलला आहे, आता आम्ही कर्नाटकमधील नंदिनी ब्रॅण्डचे तूप खरेदी करण्यास सुरुवात केली आहे.
अक्षम्य चुका करण्यात आल्या असतानाही आपण संबंधितांना पाठिशी घालावे का, असा सवाल करतानाच नायडू यांनी संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले. पूर्वीच्या सरकारने दुय्यम दर्जाचे तूप खरेदी केल्याने लाडू दर्जावर त्याचा परिणाम झाला आणि ‘टीटीडी’चे पावित्र्य भंग झाले, असेही नायडू म्हणाले.
तिरुमला तिरुपती देवस्थानने (टीटीडी) प्रयोगशाळेच्या अहवालाचा दाखला देत तुपामध्ये डुकराची चरबी आणि अन्य अशुद्ध घटक असल्याचे म्हटले आहे. प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये तुपात प्राण्यांची चरबी आढळल्याचे आणि व्यवस्थापन मंडळ तुपाच्या पुरवठादाराला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया करीत असल्याचे ‘टीटीडी’च्या कार्यकारी अधिकारी जे. श्यामला राव यांनी म्हटले आहे.
तिरुमला तिरुपती देवस्थानमध्ये देण्यात येणारे लाडू तयार करण्यासाठी दुय्यम दर्जाचे तूप वापरण्यात आले आणि दर्जा तपासणीमध्ये त्यामध्ये डुकराची चरबी आढळल्याचे स्पष्ट करून तिरुमला तिरुपती देवस्थान व्यवस्थापनाने आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या सुरात सूर मिसळला आहे.
दरम्यान तुपाचा दर्जा प्रमाणित करणाऱ्या प्राधिकाऱ्यांनी तुपाच्या नमुन्यांना प्रमाणित केल्याचा दावा 'ए आर डेअरी' या तूप पुरवठादार कंपनीने शुक्रवारी केला.
बनावट कथानक - जगनमोहन रेड्डी
दरम्यान, माजी मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी हे दुसरीकडे लक्ष वळविण्यासाठी खेळण्यात येत असलेले राजकारण आणि बनावट कथानक असल्याचे म्हटले आहे.