

नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसमध्ये (टीएमसी) मोठी बंडाळी झाली असून, पक्षांतर्गत कलह आता थेट संसदेपर्यंत पोहोचला आहे. तृणमूल बंडखोर खासदारांनी त्रिपुराच्या ‘नॅशनलिस्ट सिटीझन्स पार्टी'सोबत विलीनीकरणाची घोषणा केली आहे. पक्षांतर बंदी कायद्यापासून वाचण्यासाठी बंडखोर खासदारांनी हे पाऊल उचलले आहे. आपली खासदारकी वाचवण्यासाठी ही रणनीती आखण्यात आली आहे.
या घोषणेपूर्वी, रविवारी काकोली घोष दस्तीदार, सुदीप बंदोपाध्याय आणि शताब्दी रॉय यांच्यासह तृणमूलच्या बंडखोर खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. या बंडखोर खासदारांनी लोकसभेत आपल्यासाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.
बंडखोर गटाचा दावा आहे की, त्यांच्यासोबत टीएमसीचे २८ पैकी २० ते २२ लोकसभा खासदार आहेत. त्यांनी लोकसभा अध्यक्षांकडे संसदेत त्यांना ‘खरी तृणमूल’ संसदीय गट म्हणून मान्यता देण्याची विनंती केली आहे.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या भेटीनंतर बंडखोर खासदार काकोली घोष दस्तीदार यांनी सांगितले की, ‘आम्ही स्वतंत्र बसण्याची व्यवस्था करण्याची विनंती केली आहे. आम्ही ‘नॅशनलिस्ट सिटीझन्स पार्टी’मध्ये विलीनीकरण करत असल्याचे त्यांना कळवले आहे.’ तर, खासदार सुदीप बंदोपाध्याय म्हणाले, ‘जेव्हा ते दुसऱ्या तृणमूल काँग्रेसची मागणी करतील, तेव्हा कोणती तृणमूल खरी आहे, हे न्यायालय ठरवेल.’
खासदारकी वाचवण्यासाठी विलीनीकरणाचा पर्याय
‘नॅशनलिस्ट सिटीझन्स पार्टी’ हा त्रिपुराचा प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. ईशान्येकडील राज्ये, त्रिपुरा, आसाम आणि पश्चिम बंगालच्या काही भागात या पक्षाचा राजकीय आधार मानला जातो. हा फार मोठा किंवा राष्ट्रीय स्तरावरील मुख्य प्रवाहातील पक्ष नसून एक छोटा आणि कमी चर्चेत असलेला पक्ष आहे.
संसदेच्या नियमांनुसार, सभागृहात थेट कोणत्याही वेगळ्या गटाला मान्यता मिळू शकत नाही आणि तसे केल्यास खासदारकी रद्द होण्याचा धोका असतो. त्यामुळे तृणमूलच्या बंडखोर खासदारांनी पक्षांतर बंदी कायद्याच्या कायदेशीर अडचणींवर मात करण्यासाठी अत्यंत विचारपूर्वक या पक्षाची निवड केली आहे. सदस्यत्व वाचवण्यासाठी कोणत्याही मूळ पक्षात विलीनीकरण करणे कायदेशीररित्या अनिवार्य होते. या विलीनीकरणानंतर, हा बंडखोर गट नवीन तांत्रिक आणि कायदेशीर चौकटीसह केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीला पाठिंबा देईल.
वेगळ्या गटाला मान्यता नको - अभिषेक बॅनर्जी
बंडखोर खासदारांच्या अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याशी होणाऱ्या प्रस्तावित भेटीपूर्वी, लोकसभेतील तृणमूल काँग्रेसचे संसदीय पक्षनेते अभिषेक बॅनर्जी यांनी अध्यक्षांना पत्र लिहून पक्षाचा वेगळा गट असल्याचा दावा करणाऱ्या कोणत्याही गटाला मान्यता व दर्जा न देण्याचे आवाहन केले.