Video : ट्रॅफिक जामला कंटाळून पर्यटकाने थेट नदीत उतरवली Thar, व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी केली कारवाई

रस्त्यावर वाहतूककोंडी असल्यामुळे दिल्ली येथून आलेल्या एका पर्यटकाने आपली Mahindra Thar ही एसयूव्ही थेट लाहौल खोऱ्यातील चंद्रभागा नदीत उतरवली.
Video : ट्रॅफिक जामला कंटाळून पर्यटकाने थेट नदीत उतरवली Thar, व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी केली कारवाई

हिमाचल प्रदेशच्या लाहौल स्पीती आणि कुल्लू मनाली या जिल्ह्यांमध्ये ख्रिसमससाठी पर्यटकांची गर्दी झाली आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी आहे. अशा परिस्थितीत अनेक पर्यटक वाहतुकीचे नियम मोडून आपला जीव धोक्यात घालत आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रस्त्यावर वाहतूककोंडी असल्यामुळे दिल्ली येथून आलेल्या एका पर्यटकाने आपली महिंद्रा थार ही एसयूव्ही थेट लाहौल खोऱ्यातील चंद्रभागा नदीत उतरवली.

या पर्यटकाने जीव धोक्यात घालत चक्क थार गाडी पाण्यातून चालवतच नदी ओलांडली-. सुदैवाने, नदीतील पाण्याची पातळी फारशी नव्हती अन्यथा गाडी वाहत जाण्याची शक्यता होती. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला, त्यानंतर लाहौल स्पिती पोलिसांनी तत्काळ कारवाई केली.

व्हिडिओत वाहनाचा क्रमांक दिसत नसल्यामुळे पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे गाडीचा शोध घेतला. तेव्हा ती गाडी दिल्लीची असल्याचे समोर आले. त्यानंतर DL-4C-BB5780 या गाडीच्या मालकाचा शोध घेत वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पोलिसांनी 3500 रुपयांचे चलन जारी केले. याशिवाय, भविष्यात अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी जिल्हा पोलिसांनी सदर ठिकाणी पोलीस कर्मचारीही तैनात केले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in