आज पाहुया शाळा चांदोबा गुरुजींची..!

चांद्रयान-३ आज चंद्रावर उतरणार : वातावरण अनुकूल नसल्यास २७ ऑगस्टला प्रयत्न
आज पाहुया शाळा चांदोबा गुरुजींची..!

बंगळुरू : समस्त भारतवासीयांना ज्या क्षणाची प्रतीक्षा होती, तो आता अगदी समीप येऊन ठेपला आहे. भारताचे महत्त्वाकांक्षी चांद्रयान-३ बुधवारी सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्रावर प्रत्यक्ष उतरणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) या ऐतिहासिक घटनेची जय्यत तयारी केली आहे. यदाकदाचित चंद्रावर उतरण्यास बुधवारी अनुकूल वातावरण नसेल, तर २७ ऑगस्ट रोजी पुन्हा प्रयत्न केला जाणार आहे. नुकतेच रशियाचे लुना-२५ यान चंद्रावर उतरताना नियंत्रण सुटून नष्ट झाल्याने भारताच्या चांद्रमोहिमेच्या अखेरच्या टप्प्याबद्दल अधिक कुतूहल निर्माण झाले आहे. दरम्यान, मंगळवारी इस्रोने चांद्रयानाच्या लँडर मोड्यूलने चंद्रापासून केवळ ७० किमीवरून घेतलेली चंद्राच्या पृष्ठभागाची छायाचित्रे जारी केली आहेत.

आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून १४ जुलै रोजी प्रक्षेपण झाल्यानंतर ४० दिवसांत सुमारे ३ लाख ८४ हजार किलोमीटरचा प्रवास करत चांद्रयान-३ आता चंद्रापासून कमीत कमी २५ किमी आणि अधिकतम १०० किमीवरील कक्षेत पोहोचले आहे. तेथून बुधवारी यानाला ९० अंशांच्या कोनात वळवून चंद्राच्या पृष्ठभागाकडे पाठवले जाईल. चंद्राच्या पृष्ठभागापासून साधारण ३० किमीवर असताना ही प्रक्रिया सुरू केली जाईल. त्यावेळी यानाचा वेग प्रति सेकंद १.६८ किमी इतका असेल. इस्रोने यापूर्वी बुधवारी सायंकाळी ५ वाजून ४७ मिनिटांनी यान चंद्रावर उतरवण्याची तयारी केली होती. मात्र, आता त्यात १७ मिनिटांचा फरक करून यान ६ वाजून ०४ मिनिटांनी चंद्रावर उतरवले जाईल.

यानाने चंद्राच्या दिशेने थेट ९० अंशांत प्रवासाला सुरुवात केली की, अखेरची १७ मिनिटे अत्यंत संवेदनशील असतील. या काळात यानाचा वेग कमी करून नियंत्रित करणे खूप जिकिरीचे काम आहे. त्यात चूक झाल्यास मोहीम अयशस्वी ठरू शकते. गतवेळी चांद्रयान-२ मोहिमेदरम्यान याच टप्प्यात चूक झाल्याने मोहीम बारगळली होती. आता ती चूक टाळण्यासाठी इस्रोच्या शास्त्रज्ञांनी बराच अभ्यास करून खबरदारीची उपाययोजना केली आहे. चंद्राच्या पृष्ठभागापासून ३० किमी ते ८०० मीटर इतके अंतर पार करताना यानावरील चार रॉकेट इंजिने प्रज्वलित करून त्याचा वेग कमी केला जाईल. चंद्रापासून ८०० मीटर ते १५० मीटरपर्यंत वेग कमी करण्यासाठी दोन इंजिने वापरली जातील. तोपर्यंत यानाचा वेग शून्य झालेला असेल. त्यानंतर यानाचे सॉफ्ट लँडिंग घडवून आणले जाईल. काही कारणाने बुधवारी सॉफ्ट लँडिंग होऊ शकले नाही, तर इस्रोने २७ ऑगस्टला पुन्हा प्रयत्न करण्यासाठी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ मूळ जागेपासून ४०० किमीवर दुसरी जागा हेरून ठेवली आहे, अशी माहिती इस्रोच्या स्पेस अॅप्लिकेशन सेंटरचे संचालक निलेश देसाई यांनी दिली.

ऐतिहासिक क्षणासाठी देश सज्ज

चांद्रयान-३ बुधवारी सायंकाळी ६ वाजून ०४ मिनिटांनी चंद्रावर उतरणार आहे. तत्पूर्वी सायंकाळी ५ वाजून २७ मिनिटांपासून इस्रोची वेबसाइट, यूट्यूब चॅनेल, फेसबुक पेज आणि डीडी राष्ट्रीय टेलिव्हिजन वाहिनीवरून यानाच्या अवतरणाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. देशातील विविध शाळा, विज्ञान संशोधन आणि प्रसार केंद्रे आदी ठिकाणी हे थेट प्रक्षेपण दाखवण्याची सोय केली आहे. उत्तर प्रदेशमधील सरकारी शाळांत विद्यार्थ्यांना थेट प्रक्षेपण दाखवले जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली. गुजरातमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाने २००० शाळकरी मुलांना मोठ्या पडद्यावर थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी निमंत्रित केले आहे. आयोगाच्या गुजरातच्या ३३ जिल्ह्यांतील केंद्रांवर हे कार्यक्रम आयोजित केले जातील. तेथे विद्यार्थ्यांचा शास्त्रज्ञांशी संवादही घडवून आणला जाईल, अशी माहिती आयोगाचे अध्यक्ष नरोत्तम साहू यांनी दिली. कोलकाता येथे राज्याच्या सांस्कृतिक मंत्रालयाने सायन्स पार्टीचे आयोजन केले आहे, तर बंगळुरू येथील एका रेस्तराँमध्ये उद्योगपती आणि अग्नीर्व नावाच्या विज्ञानप्रेमी गटाचे संस्थापक श्रीकांत चुंदुरी यांनी खास पार्टीचे आयोजन केले आहे. मुंबई आणि वाराणसीमध्ये चांद्रमोहिमेच्या यशासाठी नागरिकांनी प्रार्थना केल्या. काही ठिकाणी त्यासाठी विशेष नमाज अदा करण्यात आली.

इस्रोचा व्यग्र कार्यक्रम

चांद्रयान-३ मोहिमेपाठोपाठ इस्रोचा अत्यंत व्यग्र कार्यक्रम राहणार आहे. भारत लवकरच सूर्याच्या अभ्यासासाठी आदित्य एल-१ उपग्रह मोहीम हाती घेत आहे. चंद्र आणि अन्य ग्रहांवर भारतीय अंतराळवीर पाठवण्यासाठी गगनयान नावाची मोहीम हाती घेतली आहे. हवामानाच्या अभ्यासासाठी इन्सॅट-३ डीएस उपग्रह प्रक्षेपित केला जाईल. तसेच भारत आणि अमेरिकेच्या संयुक्त विद्यमाने निसार नावाचा सिंथेटिक अॅपर्चर रडार कार्यक्रम हाती घेतला आहे, अशी माहिती इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी दिली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in