टोमॅटो ३०० रुपये किलो होणार

घाऊक व्यापाऱ्यांनी व्यक्त केली शक्यता
टोमॅटो ३०० रुपये किलो होणार

नवी दिल्ली : गेले महिनाभर १६० ते १८० रुपये किलो असणारा टोमॅटो ३०० रुपये किलो जाण्याची शक्यता घाऊक व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

एपीएमसीचे सदस्य कौशिक यांनी सांगितले की, घाऊक भाजी विक्रेत्यांना टोमॅटो, ढोबळी मिरची व अन्य भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाल्याने मोठा तोटा झाला आहे. घाऊक बाजारात टोमॅटोचे दर १६० वरून २२० रुपये किलो झाले आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारातही टोमॅटो महागले आहेत.

मदर डेअरीने सफल रिटेल स्टोअर्समधून २५९ रुपये किलोने टोमॅटो विकण्यात सुरुवात केली. गेल्या महिन्यापासून टोमॅटोच्या दरात वाढ झाली आहे. टोमॅटो उत्पादक राज्यांत मोठा पाऊस झाल्याने पिकाचे नुकसान झाले आहे. तसेच हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस व दरडी कोसळल्याने भाज्यांची वाहतूक कठीण बनली आहे.

शेतकऱ्यांकडून मंडईत भाजी आणताना नेहमीपेक्षा ६ ते ८ तास अधिक लागत आहेत. त्यामुळे टोमॅटोचे दर लवकरच ३०० रुपये प्रतिकिलो होतील, असे आझादपूर मंडीचे घाऊक व्यापारी संजई भगत यांनी सांगितले.

हिमाचल प्रदेश, कर्नाटक व महाराष्ट्रातील टोमॅटो व भाज्यांचा दर्जाही घसरला आहे. आझादपूर एपीएमसीचे सदस्य अनिल मल्होत्रा म्हणाले की, बाजारात टोमॅटोची मागणी व पुरवठा याच्यात मोठी तफावत आहे. व्यापाऱ्यांना भाज्यांच्या वाहतुकीत लागणारा विलंब, त्याचा खराब दर्जा आदींचा सामना करावा लागत आहे. ग्राहक टोमॅटो, भोपळी मिरची, फ्लॉवर, कोबी आदी भाजीच घेत नाही, असे ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in