

बिजापूर : छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी आठ लाख रुपयांचे इनाम असलेल्या नक्षलवाद्याचा खात्मा केला. या नक्षलवाद्याचे नाव उधमसिंह असे असून तो २२ जवानांवरील हल्ल्याच्या नियोजनात सहभागी होता.
तारेम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगल आणि डोंगराळ प्रदेशात उधमसिंह आणि त्याचे काही साथीदार असल्याची खबर मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी तेथे कारवाई सुरू केली. यावेळी दोन्ही बाजूंनी गोळीबार करण्यात आला. गोळीबार थांबल्यानंतर उधमसिंह याचा मृतदेह आढळला.
उधमसिंह याच्याकडून एके-४७ रायफल, दोन मॅगझीन्स आणि २८ काडतुसे,कॉर्डेक्स वायर, बिनतारी यंत्रणा संच, एक मोबाइल, जेवणाचा डबा आणि अन्य माओवादी साहित्य जप्त करण्यात आले. उधमसिंह याच्या छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर मुख्यत्वे कारवाया सुरू होत्या.
१२ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण
दरम्यान, छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात गुरुवारी १२ नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. या नक्षलवाद्यांवर एकूण ४६ लाख रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आले होते, असे पोलिसांनी सांगितले.
आत्मसमर्पण करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांमध्ये आठ महिलांचा समावेश आहे. राज्य सरकारच्या आत्मसमर्पण आणि पुनर्वसन धोरणाने प्रभावित होऊन हे नक्षलवादी शरण आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या नक्षलवाद्यांनी एके-४७, दोन एसएलआर, जिलेटिनच्या २५० कांड्या, ४०० डिटोनेटर्स, गन पावडरने भरलेले प्लास्टिकचे एक पिंप आणि एक बंडल कॉर्डेक्स वायर असा शस्त्रसाठा पोलिसांकडे सुपूर्द केला.