उत्तर प्रदेशच्या कासगंजमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. माघ पोर्णिमा असल्याने गंगा नदीत स्नान करण्यासाठी गेलेल्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे. ४० जणांनी खचाखच भरलेला ट्रॅक्टर तलावात पलटी झाल्याने जवळपास २२ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महिला आणि मुलांचाही समावेश आहे. गाधाई येथील रियाजगंज-पटीयाली लिंक रोडवर ही दुर्देवी घटना घडली. चालकाने ट्रॅक्टर अतिवेगाने चालवल्याने अपघात घडल्याची माहिती स्थानिकांनी दिलीय. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये तर जखमींना ५० हजारांची मदत देण्याचं जाहीर केलं आहे.
या घटनेबाबत पोलीस अधिक्षक अपर्णा रजत कौशिक यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय, तलावात अडकलेल्या नागरिकांना बुलडोझरच्या साहाय्याने बाहेर काढले जात आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ट्रॉली पडल्यावर रस्त्यावरुन जाणारे इतर लोकही जखमी झाले आहेत. या गंभीर घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केलं. या दुर्देवी घटनेत जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिलीय