

नवी दिल्ली: देशांतर्गत तसेच परदेशात युवकांसाठी नव्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने भारत विविध देशांशी व्यापार आणि स्थलांतर करार करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सांगितले.
१८व्या रोजगार मेळाव्यात पंतप्रधान मोदी बोलत होते. या कार्यक्रमात त्यांनी विविध सरकारी सेवांसाठी निवड झालेल्या ६१ हजार उमेदवारांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने नियुक्तीपत्रे प्रदान केली. भारत अनेक देशांशी व्यापार आणि मोबिलिटी करार करत आहे.
या व्यापार करारांमुळे देशातील युवकांसाठी नव्या संधी निर्माण होत आहेत, असे पंतप्रधानांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशभरातील ४५ ठिकाणी आयोजित रोजगार मेळाव्याला संबोधित करताना सांगितले.
जगात सर्वाधिक युवकसंख्या भारतात असून, देशांतर्गत आणि परदेशात युवकांसाठी नव्या संधी निर्माण करण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अलीकडच्या काळात आधुनिक पायाभूत सुविधांमध्ये सरकारने अभूतपूर्व गुंतवणूक केली असून, त्यामुळे बांधकामाशी संबंधित क्षेत्रांत रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात वाढल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
भारताची 'स्टार्टअप इकोसिस्टिम' झपाट्याने विस्तारत असून, जवळपास दोन लाख नोंदणीकृत स्टार्टअप्समधून २१ लाखांहून अधिक युवकांना रोजगार मिळत आहे. 'डिजिटल इंडिया' उपक्रमामुळे नवी अर्थव्यवस्था विस्तारली असून, अनिमेशन, डिजिटल मीडिया आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये भारत जागतिक केंद्र म्हणून उदयास येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
आज देश सुधारणांच्या एक्स्प्रेसवर स्वार झाला असून, जीवन आणि व्यवसाय अधिक सुलभ करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. जीएसटीमधील पुढील पिढीच्या सुधारणांमुळे युवक उद्योजक आणि एमएसएमईंना लाभझाला असून, ऐतिहासिक कामगार सुधारणांमुळे कामगार आणि कर्मचाऱ्यांसाठी सामाजिक सुरक्षेला बळ मिळाले आहे, ज्याचा फायदा व्यवसायांनाही होत आहे. नव्या कामगार संहितांमुळे सामाजिक सुरक्षेचा विस्तार होऊन ती अधिक सक्षम झाली आहे, असे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान कार्यालयाच्या निवेदनानुसार, रोजगार मेळा हा पंतप्रधानांच्या रोजगारनिर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या वचनबद्धतेनुसार या दृष्टीकोनाची अंमलबजावणी करणारा महत्त्वाचा उपक्रम आहे. या उपक्रमाच्या सुरुवातीपासून देशात आयोजित रोजगार मेळ्यांमधून ११ लाखांहून अधिक नियुक्तीपत्रे वितरित करण्यात आली आहेत.
नवीन नियुक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती गृह मंत्रालय, आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग, उच्च शिक्षण विभाग आदी मंत्रालये व विभागांमध्ये करण्यात आली आहे.
'नागरिक देवो भवः' मंत्रानुसार काम करा!
नवीन नियुक्त कर्मचाऱ्यांनी नियुक्तीपत्रांकडे राष्ट्रनिर्मितीमध्ये सहभागी होण्याचे आमंत्रण आणि 'विकसित भारत' घडविण्यासाठी दिलेली प्रतिज्ञा म्हणून पाहावे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. आपल्या कार्यकाळात नागरिकांना अशा अडचणींना सामोरे जावे लागू नये, असा संकल्प करण्याचे आवाहनही त्यांनी युवकांना केले. कर्तव्य बजावताना 'नागरिक देवो भवः' या मंत्रानुसार काम करण्याचा सल्ला पंतप्रधानांनी दिला.