रेल्वेमार्गावरील जगातील सर्वात उंचीचा आर्चब्रीज पूर्ण; चिनाब रेल्वे पुलावर ट्रेनची चाचणी यशस्वी

जम्मू-काश्मीरच्या रियासी येथे रेल्वे मार्गावरील जगातील सर्वात उंचीचा चिनाब पूल बनवण्याचे काम पूर्ण झाले आहे.
रेल्वेमार्गावरील जगातील सर्वात उंचीचा आर्चब्रीज पूर्ण; चिनाब रेल्वे पुलावर ट्रेनची चाचणी यशस्वी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या रियासी येथे रेल्वे मार्गावरील जगातील सर्वात उंचीचा चिनाब पूल बनवण्याचे काम पूर्ण झाले आहे. या चिनाब पुलावरून सोमवारी घेण्यात आलेली ट्रेनची चाचणी यशस्वी झाली आहे. त्यामुळे लवकरच या रेल्वे पुलावरून रेल्वे सेवा सुरू करण्याची तयारी उत्तर रेल्वेने केली आहे.

हा पूल संगलदानला रामवन जिल्ह्याशी जोडतो. रेल्वे अभियंते दीपक कुमार यांनी सांगितले की, या पुलावरून लवकरच रेल्वे वाहतूक सुरू केली जाईल. ट्रेनची चाचणी यशस्वी झाल्यानंतर आम्ही खूप खूश झालो आहोत. हा पूल उभारणे हे एक आव्हान होते. पूल उभारताना अनेक अडथळे आले. त्यावर मात करीत आम्ही हे काम पूर्ण केले. अभियंते व कामगारांनी या कामासाठी खूप मेहनत घेतली. त्यामुळेच हे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे.

भारतीय रेल्वे कन्याकुमारी ते कटरापर्यंत धावते, तर बारामुल्ला ते काश्मीर खोऱ्यात संगलदानपर्यंत धावते. उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे जोडणी प्रकल्प या वर्षाअखेर पूर्ण होईल. या प्रकल्पाचे उद‌्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० फेब्रुवारी २०२४ रोजी केले होते. या प्रकल्पात ४८.१ किमी बनिहाल-संगलदान रेल्वेमार्गाचा समावेश आहे.

या पुलाचे महत्त्व

चिनाब रेल्वे पूल चिनाब नदीपासून ३५९ मीटर उंचीवर आहे. हा पूल आयफेल टॉवरपेक्षा ३५ मीटर अधिक उंच आहे. १,३१५ मीटर लांबीचा हा पूल सीमावर्ती प्रकल्पाचा एक भाग आहे. काश्मीर खोऱ्यात भारतीय रेल्वे पोहचवणे हे रेल्वेचे उद्दिष्ट आहे. काश्मीर खोऱ्यात रेल्वेचे जाळे विकसित केल्याने सामरिकदृष्ट्या ते एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जाते. यामुळे वेगाने लष्करी हालचाली करणे भारताला शक्य होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in