भाजप-एनआयएची अभद्र युती! तृणमूल काँग्रेसचा आरोप

पश्चिम वर्धमान जिल्ह्यातील भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘एनआयए’च्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याची न्यू टाऊन परिसरातील एका फ्लॅटमध्ये २६ मार्च रोजी सायंकाळी भेट घेतली आणि राज्याच्या विविध भागातून तृणमूलच्या कोणत्या नेत्यांना निवडणुकीपूर्वी अटक करावयाची त्यांच्या नावांची यादी अधिकाऱ्याकडे सादर केली, असा आरोप तृणमूलचे ज्येष्ठ नेते कुणाल घोष यांनी केला.
भाजप-एनआयएची अभद्र युती! तृणमूल काँग्रेसचा आरोप

कोलकाता : राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि भाजपची अभद्र युती झाली असल्याचा आरोप रविवारी पश्चिम बंगालमधील सत्तारूढ तृणमूल काँग्रेसने केला. निवडणूक आयोगाने याबाबत सूचक मौन पाळले असल्याचे स्पष्ट होत आहे, असेही तृणमूलने म्हटले आहे.

निवडणूक आचारसंहितेचा भंग केला जात असून तृणमूलच्या नेत्यांविरुद्ध षडयंत्र रचण्यासाठी ‘एनआयए’ आणि भाजप यांच्यात अभद्र समझोता झाला असल्याचे तृणमूलचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी 'एक्स'वर म्हटले आहे. अशा प्रकारे अभद्र युती झाल्याने निवडणूक आयोग त्याकडे डोळेझाक करीत असून निवडणुका मोकळ्या वातावरणात पार पाडण्याच्या आपल्या कर्तव्यात कसूर करीत आहे, असेही बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

पश्चिम वर्धमान जिल्ह्यातील भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘एनआयए’च्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याची न्यू टाऊन परिसरातील एका फ्लॅटमध्ये २६ मार्च रोजी सायंकाळी भेट घेतली आणि राज्याच्या विविध भागातून तृणमूलच्या कोणत्या नेत्यांना निवडणुकीपूर्वी अटक करावयाची त्यांच्या नावांची यादी अधिकाऱ्याकडे सादर केली, असा आरोप तृणमूलचे ज्येष्ठ नेते कुणाल घोष यांनी केला. भाजपचा हा ज्येष्ठ नेता यापूर्वी तृणमूल काँग्रेसमध्ये होता, असेही ते म्हणाले.

आपण त्या नेत्याला आव्हान देतो की, त्याने आरोप फेटाळावेत किंवा २६ मार्च रोजी तो कुठे होता त्याचे सीसीटीव्ही फुटेज ४८ तासांत सादर करावे, असे घोष यांनी म्हटले आहे.

‘एनआयए’ने फटाक्यांच्या कारखान्यात २०२२ मध्ये झालेल्या स्फोटाचे प्रकरण आता उकरून काढले आहे. त्यावरून भाजप केंद्रीय यंत्रणांचा वापर करून तृणमूलच्या नेत्यांविरुद्ध कारस्थान रचत असल्याचे स्पष्ट होत आहे, असे तृणमूल काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चंद्रिमा भट्टाचार्य यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in