

कोलकाता : तृणमूल काँग्रेसने राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा केली असून यामध्ये मंत्री बाबुल सुप्रियो, बंगालचे माजी डीजीपी राजीव कुमार, ज्येष्ठ वकील मेनका गुरूस्वामी आणि अभिनेत्री कोयल मल्लिक यांच्या नावांचा समावेश आहे. तृममूल काँग्रेसने ज्या ज्येष्ठ वकील मेनका यांना उमेदवारी दिली आहे त्या ‘एलजीबीटीक्यू’ समुदायातील आहेत. जर त्या विजयी झाल्या तर संसदेच्या इतिहासातील त्या पहिल्याच ‘एलजीबीटीक्यू’ समुदायातील खासदार असतील..पश्चिम बंगालसह महाराष्ट्र, ओडिशा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, बिहार, छत्तीसगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि तेलंगणा येथून निवडलेल्या ३७ सदस्यांचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपेल. या रिक्त जागांसाठी १६ मार्च रोजी मतदान होणार आहे.
पश्चिम बंगालमधून २०२६ मध्ये राज्यसभेच्या पाच जागा रिक्त होत आहेत. यापैकी चार जागा तृणमूलकडे होत्या. २९४ सदस्यांच्या विधानसभेत मजबूत संख्याबळासह तृणमूल काँग्रेस पाचपैकी चार राज्यसभा जागा जिंकणार आहे, तर विरोधी भाजपला एक जागा मिळण्याची अपेक्षा आहे. मेनका गुरूस्वामी या सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील आहेत. गुरूस्वामी यांनी २०१८ मध्ये आयपीसीच्या कलम ३७७ रद्द करून भारतात समलैंगिकतेला गुन्हेगारीच्या श्रेणीतून बाहेर काढणाऱ्या ऐतिहासिक संवैधानिक आव्हानात याचिकाकर्त्यांचे प्रतिनिधित्व केले होते. त्या एलजीबीटीक्यू समुदायातील आहेत.
मेनका आणि त्यांच्या पार्टनर अरुंधती काटजू या दोघींनी सार्वजनिकरित्या कबूल केले आहे की, ते एक जोडपे आहेत. हे पाऊल एलजीबीटीक्यू समुदायासाठी एक मोठा संदेश ठरणार आहे.. २०१९ मध्ये टाईम मॅगझिनने त्यांना एलडीबीटीक्यू अधिकारांवरील कार्यासाठी आणि प्रबावासाठी जगातील १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये समाविष्ट केले होते.
बाबुल सुप्रियो हे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्री होते. केंद्रीय मंत्रिमंडळातून बाहेर काढल्यानंतर त्यांनी भाजप सोडला. सप्टेंबर २०२१ मध्ये ते तृणमूलमध्ये सामील झाले होते. नंतर त्यांनी टीएमसीच्या तिकिटावर बल्लीगंज विधानसभा पोटनिवडणूक जिंकली. ममता सरकारमध्ये ते मंत्री आहेत.