संदेशखलीतील आरोपींसाठी तृणमूलच्या गुंडांच्या महिलांना धमक्या; पश्चिम बंगालमध्ये नरेंद्र मोदींचा आरोप

तृणमूल काँग्रेसच्या व्होट बँकेच्या राजकारणावर रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार हल्ला चढविला.
संदेशखलीतील आरोपींसाठी तृणमूलच्या गुंडांच्या महिलांना धमक्या; पश्चिम बंगालमध्ये नरेंद्र मोदींचा आरोप

बराकपूर/हुगळी : तृणमूल काँग्रेसच्या व्होट बँकेच्या राजकारणावर रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार हल्ला चढविला. संदेशखली प्रकरणातील आरोपींना संरक्षण देण्यासाठी तृणमूल काँग्रेसचे गुंड तेथील पीडित महिलांवर दबाव आणत असल्याचा आरोप मोदी यांनी केला.

काँग्रेसच्या शहजाद्यांचे जेवढे वय आहे तेवढ्या मोजक्याच जागा लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मिळतील, असा दावा मोदी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे नाव न घेता केला. तृणमूलच्या राजवटीत हिंदू या राज्यात दुय्यम नागरिक झाले आहेत, जोपर्यंत मोदी आहेत तोपर्यंत सीएए कायदा कोणीही रद्द करू शकणार नाही, असेही पंतप्रधान म्हणाले.

संदेशखलीमधील माता-भगिनींबाबत तृणमूलने कसा व्यवहार केला हे आपण सर्वांनीच पाहिले आहे, संदेशखली प्रकरणातील मुख्य आरोपीचे नाव शहाजहान शेख असल्याने तृणमूल काँग्रेसचे गुंड तेथील महिलांना धमक्या देत आहेत, संदेशखलीतील आरोपींना पाठीशी घालण्यासाठी तृणमूल शक्य ते सर्व प्रयत्न करीत आहे, असेही मोदी म्हणाले.

भाजपचे नेते संदेशखलीतील महिलांच्या कोऱ्या कागदावर सह्या घेऊन त्यावर तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी लैंगिक छळ केल्याच्या तक्रारी लिहित असल्याचे अनेक व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले. त्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी वरील आरोप केले. तृणमूलच्या राजवटीत पश्चिम बंगाल राज्य भ्रष्टाचाराचे केंद्र आणि बॉम्ब तयार करण्याचा कुटिरोद्योग बनला आहे, बंगालमध्ये तृणमूलने व्होट बँकेसमोर शरणागती पत्करली आहे, असे त्यांनी सांगितले.

भ्रष्टाचार हा तृणमूलचा पूर्णवेळ व्यवसाय

भ्रष्टाचार ही इंडिया आघाडीतील पक्षांची स्वभाववृत्ती आहे आणि भ्रष्टाचार हा तृणमूल काँग्रेसचा पूर्णवेळ व्यवसाय झाला आहे, अशी टीकाही नरेंद्र मोदी यांनी केली. राज्यात असंतोष निर्माण करणे हाच तृणमूलच्या नेत्यांचा व्यवसाय आहे, तृणमूल, काँग्रेस किंवा डावे यांची भ्रष्टाचार हीच स्वभाववृत्ती आहे, असेही ते म्हणाले, इंडिया आघाडीतील काही पक्ष भ्रष्टाचार लपून करतात, मात्र तृणमूल तो जाहीरपणे करतो, असेही ते म्हणाले.

राज्यपालांवरील आरोपाबाबत मोदी अवाक्षरही काढत नाहीत - ममता

संदेशखली प्रकरणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी अद्यापही असत्य पसरवत आहेत, मात्र राज्याचे राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस यांच्यावर करण्यात आलेल्या विनयभंगाबाबत ते अवाक्षरही काढत नाहीत आणि त्यांना राजीनामा देण्यासही सांगत नाहीत, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. संदेशखली हे भाजपचे कारस्थान असल्याचे आता जगजाहीर झाले आहे, मोदींना त्याबाबत शरम वाटली पाहिजे, महिला आता राज भवनात जाण्यास घाबरत आहेत, असेही ममता म्हणाल्या.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in